दापोली : दापोली तालुक्यातील साकुर्डे येथे २८ मे रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घरात घुसून एका दाम्पत्याला शिवीगाळ करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी एका महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, चार आरोपींविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला, त्यांचे पती आणि दोन मुली जेवण करत बसले असताना आरोपी मारुती शांताराम सकपाळ, अमित मारुती सकपाळ, मोहन सकपाळ (सर्व रा. साकुर्डे, ता. दापोली) आणि राजू सातारकर (रा. मौजे दापोली, ता. दापोली) हे घरात घुसले. त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या पतीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आरोपी क्रमांक १, मास्ती शांताराम सकपाळ याने फिर्यादीच्या पती अशोक शांताराम सकपाळ (वय-३८, रा. जालगाव पांगारवाडी, मूळ रा. साकुर्डे) यांच्या डोक्यात कुऱ्हाडीच्या लाकडी दांड्याने मारहाण केली.
यावेळी फिर्यादीलाही हाताने मारहाण करून त्यांचा गळा पकडून ढकलून देण्यात आले. आरोपी क्रमांक १ आणि २ यांनी फिर्यादीच्या पतीला पुन्हा हाताने मारहाण केली. याशिवाय, आरोपी क्रमांक २, अमित मास्ती सकपाळ याने “या सर्वांना जीवे ठार मारून टाका” अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेनंतर फिर्यादीने २९ मे रोजी पहाटे १.५४ वाजता दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गु.र.नं. १०४/२०२५ भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ११८(१), ३३३, ११५(२), ३५१(२), ३५२, ३५ (५) नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:21 30-05-2025














