चिपळूण : निसर्ग बोलत नसला तरी तो अशा पद्धतीने व्यक्त होत असतो. यावर्षी मे महिन्यामध्येच जोरदार पाऊस झाला. यातून निसर्गाचा समतोल ढासळला आहे, हे स्पष्ट होते. त्यामुळे वृक्षारोपणाची चळवळ व्हायला हवी, लोकसहभाग वाढायला हवा, असे मत नाम फाउंडेशनचे व ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी येथे व्यक्त केले. तालुक्यातील पिंपळी बु. येथे अनासपुरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
महाराष्ट्र शासन वसुंधरा अभियान, ग्रामपंचायत पिंपळी बु., काळकाई फाउंडेशन यांच्या माध्यमातून पिंपळी बु. येथे अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते वृक्षलागवड व मियावाकी जंगलनिर्मितीचा प्रारंभ झाला. या वेळी प्रांताधिकारी आकाश लिगाडे, नामचे कोकण विभाग समन्वयक समीर जानवलकर, शाहनवाज शाह, महेंद्र कासेकर, पिंपळीच्या सरपंच अंजली जांबुगें आदी उपस्थित होते.
या वेळी प्रांताधिकारी व अनासपुरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. श्री. अनासपुरे म्हणाले, ‘आम्ही राज्यभरात वृक्षारोपण करत आहोत. पुण्यातील खडकवासला धरणाच्या बाजूला मोठे जंगल उभे राहिले आहे. त्या ठिकाणी जैवविविधता निर्माण झाली आहे. जैवविविधता वाढली तरच निसर्ग टिकेल; मात्र, हे काम कुण्या एकट्याचे नाही. त्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. प्रत्येकाने या कार्यात सहभाग घ्यायला हवा. याप्रसंगी प्रांताधिकारी लिगाडे व अनासपुरे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला बापू काणे, कैसर देसाई, रवींद्र सागवेकर, देवस्थान समिती अध्यक्ष सदानंद कडव, नंदा सागवेकर, हरिश्चंद्र चव्हाण उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:02 PM 30/May/2025














