चिपळूण : निधीअभावी रखडला कळंबस्ते उड्डाणपूल

चिपळूण : कोकण रेल्वेमार्गावर जिल्ह्यातील एकमेव चिपळूण कळंबस्ते रेल्वेफाटक असून, हे फाटक दिवसभरात ३४ फेऱ्यांसाठी बंद ठेवावे लागते. या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याची मागणी ३२ वर्षे केली जात आहे. त्याप्रमाणे सुमारे २० कोटी ५२ लाखांच्या निधीचे अंदाजपत्रक तयार केले आहे; मात्र अद्याप निधीची तरतूद होत नसल्याने चिपळूणसह खेड पंधरा गावांच्या प्रवाशांचा नियमित खोळंबा होत आहे.

तालुक्यातील कळंबस्ते रेल्वेफाटकाला सुरुवातीपासूनच विरोध केला जात आहे. या फाटकामुळे चिपळूण व खेड तालुक्यातील २१ गावं अडचणीत आली आहेत. यामध्ये चिपळूण हद्दीतील कळंबस्ते, नवीन कोळकेवाडी, दळवटणे, खांदाटपाली, निरबाडे, मोरवणे तसेच खेड हद्दीतील आंबडस, चिरणों, भेलसई, केळणे, काडवली, कुंबवली, मुसाड, वावे, कुरवळ खेड, करवळ जावळी, धामणंद, कासई, सापेलों, तळवट पाली, चोरवण आदी गावांमधील प्रवाशांचा नियमित खोळंबा होत आहे. दिवसभरात १७रेल्वेगाड्यांची ये-जा होत असल्याने एकूण ३४ फेऱ्या दररोज होतात.

या प्रत्येक फेरीसाठी किमान १० ते १५ मिनिटे फाटक बंद ठेवला जातो याशिवाय हंगामात जादा गाड्या सोडल्या जातात, तेव्हा तर दिवसभरात अनेकदा फाटक बंद केला जातो. या कालावधीत स्थानिक प्रवाशांचे व वाहतूकदारांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात. या फाटकाच्या ठिकाणी उड्डाणपूल होण्यासाठी आतापर्यंत अनेकदा आंदोलने केली गेली. कोकण रेल्वे अन्याय निवारण समिती अध्यक्ष शौकत मुकादम व स्थानिक या उड्डाणपुलासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. या उड्डाणपुलासाठी २०२१-२२च्या अंदाजपत्रकानुसार, सुमारे २० कोटी ५२ लाखांच्या निधीची आवश्यकता आहे.

कळंबस्ते गाव मुंबई-गोवा महामार्गाशी जोडलेले असल्याने पंधरागाव विभागात ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या अधिक आहे. या मार्गावर रेल्वेफाटक असल्याने वाहतूककोंडी होते आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात.

मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र रेल्वेफाटक मुक्त करू, अशी घोषणा केली आहे. त्याप्रमाणे जिल्ह्यातील एकमेव असलेल्या कळंबस्ते रेल्वेफाटकाच्या ठिकाणी तातडीने उड्डाणपुलाचे काम हाती घ्यावे- शौकत मुकादम, अध्यक्ष कोकण रेल्वे अन्याय निवारण समिती, चिपळूण

कोकण रेल्वेमार्गावरील गाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने 66 कळंबस्ते रत्वेफाटकाची समस्या गंभीर होत चालली आहे. आता वेळ न घालवता उड्डाणपुलाचे काम हाती घेतले पाहिजे- शंकर सावर्डेकर, काडवली, खेड

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:09 PM 30/May/2025