चिपळूण : मागील २० वर्षातील पूर व आपत्कालीन परिस्थितीचा अंदाज घेऊन येथील प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. तालुक्यातील १५ गावांमधील ३६६ कुटुंबांना दरडीचा व पुराचा धोका आहे. संबंधितांना प्रशासनामार्फत नोटिसा बजावण्यात आल्या असून, आतापासूनच प्रशासन ‘अलर्ट मोड’वर आल्याची स्थिती आहे. गतवर्षीप्रमाणे कोळकेवाडी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यवस्थापन समिती स्थापन केल्याने प्रशासनाच्या या भूमिकेचे चिपळूणकरांकडून स्वागत केले जात आहे.
यावर्षी आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा तयार करताना २००५ व २०२१ मध्ये सर्वाधिक उंची गाठलेल्या महापुराचा अंदाज घेण्यात आला आहे. त्यानुसार आपत्कालीन व्यवस्थापनात काही बदल केले आहेत. प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. विशेष बाब म्हणजे पूरपरिस्थितीत कोळकेवाडी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने तसेच कोळकेवाडी धरण व्यवस्थापन व महाजनकोच्या अधीक्षक अभियंत्यांना पूरपरिस्थितीमध्ये जनरेशन कशाप्रकारे करावे, याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आपत्कालीन परिस्थितीत कामकाज चालणार आहे. त्यामुळे चिपळूणच्यादृष्टीने हा निर्णय तितकाच महत्त्वाचा मानला जात आहे. प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे.
दरडग्रस्त गावांमध्ये नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्यामध्ये पेढे, परशुराम घाट, तिवरे (गावठाणवाडी, फणसवाडी), तिवडी (उगवतवाडी), पेढांबे (रिंगी धनगरवाडी), येगाव, कामथे खुर्द, कापसाळ, गोवळकोट, मिरजोळी, कळकवणे, आकले, कोळकेवाडी, पोफळी, कळंबट व वीर आदी ठिकाणी दरडींचा धोका आहे. एखाद्या गावात आपत्कालीन घटना घडल्यास तेथील शाळांमध्ये निवाराकेंद्र स्थापन केले जाणार आहेत.
शहरात ६ ठिकाणी निवाराकेंद्रे
पूरपरिस्थितीत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी पूरक्षेत्राबाहेर ६ ठिकाणी निवाराकेंद्रे सज्ज करण्यात आली आहेत. यामध्ये पाग मराठी शाळा, डीबीजे महाविद्यालय, पाग महिला विद्यालय, ओझरवाडी मराठी शाळा, नगरपालिका इमारत उक्ताड, पाटीदार भवन कापसाळ, रावतळे यांचा समावेश असून, यात सुमारे १ हजार ६०० नागरिक राहतील, अशी व्यवस्था आहे.
१० ठिकाणी ‘पब्लिक अॅड्रेस सिस्टीम‘
आपत्तीबाबत नागरिकांना वेळीच पूर्वसूचना मिळाव्यात यासाठी शहरातील उक्ताड गणपती मंदिर गोरिवले इमारत, अलिना अपार्टमेंट भेंडीनाका, मनोहर आर्केड बुरूमतळी, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, देसाई बिल्डिंग काविळतळी, कृष्णाजी कॉम्प्लेक्स चिंचनाका, बाजारपेठ गांधीचौक, कमलकुंज बिल्डिंग पेठमाप, गोवळकोटरोड सॉमिलशेजारी, गोवळकोटरोड कमनीजवळ अशा १० ठिकाणी पब्लिक अॅड्रेस सिस्टीम बसवण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:18 PM 30/May/2025














