मॉन्सूनपूर्व पावसाने विस्कटली मच्छीमारांची घडी

राजापूर : मॉन्सूनपूर्व पावसाचे दमदार आगमन यामुळे वेळेआधी मच्छीमार हंगाम संपुष्टात आला. वादळीवारा आणि पाऊस यामुळे समुद्रकिनारी भागातील वातावरण खराब असल्याने मच्छीमार बांधवांनी मच्छीमारी नौका बंदरामध्ये उभ्या करून ठेवण्याला प्राधान्य दिले होते. त्यामुळे गेल्या दहा दिवसांमध्ये नाटे बंदरामध्ये होणारी सुमारे ५० लाख रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. येत्या रविवारपासून (१ जून) मासेमारी बंदीचा कालावधी सुरू होणार असल्याने मासेमारीच्या अंतिम टप्प्यात चांगले पैसे मिळवण्याच्या मच्छीमारांच्या आशेवर निसर्गाने पाणी पेरले आहे.

दरम्यान, वादळीवारा आणि पाऊस यामुळे समुद्रकिनारी भागातील वातावरण खराब असल्याने मच्छीमार बांधवांनी मच्छीमारी नौका बंदरामध्ये उभ्या करून ठेवण्याला प्राधान्य दिले होते; मात्र कालपासून वातावरण पुन्हा सुरळीत होताच काहींनी बंदरामागे उभ्या केलेल्या नौका कियऱ्यावर घेण्यास सुरुवात केली आहे. यावधीचा मासेमारी हंगाम अंतिम टप्प्यामध्ये अवकाळी आणि मॉन्सूनपूर्व पावसाने जोर धरला, त्याला वादळी वाऱ्यांची साथ मिळाल्याने समुद्रातील प्रतिकूल वातावरणामुळे मच्छीमारांना मासेमारी करणे मुश्कील झाले होते.

हवामान खात्याकडून सातत्याने प्रतिकूल वातावरणाचा संदेश देत समुद्रामध्ये जाण्यास मच्छीमारांना मचाव करण्यात येत होता. त्यातून, मच्छीमारांनी मासेमारीला जाण्याऐवजी होड्या बंदरामध्ये उभ्या करून ठेवल्या होत्या. तालुक्यातील नाटे बंदरामध्ये नाटे, साखरीनाटे, सागवे, आंबोळगड, जैतापूर, तुळसुंदे आदी गावांतील सुमारे २५०-३०० मच्छीमार हंगामामध्ये मासेमारी करतात. प्रतिकूल वातावरणामुळे गेल्या दहा दिवसांपासून बंदरामध्ये उभ्या असलेल्या होड्या तर दुसऱ्या बाजूला यावर्षीचा मासेमारीबंदीचा दोन दिवसांमध्ये सुरू होणारा कालावधी पाहता वेळेआधी यावर्षीचा मच्छीमार हंगाम संपुष्टात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे बंदरामध्ये उभ्या असलेल्या होड्या किनाऱ्यावर आणण्याची लगबग सुरू झाली आहे.

प्रतिकूल वातावरण आणि वादळी पाऊस यामुळे गेल्या दहा दिवसांपासून मासेमारी ठप्प आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यामध्ये चांगले मासे मिळतात. त्यातून चांगले पैसेही मिळतात. मात्र, प्रतिकूल वातावरणामुळे त्या आशाही मावळल्या आहेत. दोन दिवसांमध्ये मासेमारी बंदी कालावधी लागू होणार असल्याने मच्छीमार बांधवांचा यावर्षीच्या मासेमारी हंगामाचा शेवट निराशाजनक म्हणावा लागेल-अमजद बोरकर, मच्छीमार

जाळी वाळवण्यासही अवधी नाही
मासेमारी हंगामाच्या शेवटी मच्छीमारी जाळी चांगली स्वच्छ करून उन्हात वाळवून सुरक्षित ठिकाणी ठेवली जातात; मात्र यंदा जाळी वाळवण्याची संधी पावसाने मच्छीमारांना दिली नाही. सुरुवातीला मॉन्सूनपूर्व पाऊस कोसळत असल्याने नंतर पाऊस थांबेल, या आशेवर मच्छीमार असतानाच त्याला जोडूनच मॉन्सूनचेही आगमन झाल्याने मासेमारीची जाळी बाळवण्यास पुरेसा अवधी मिळालेला नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:40 PM 30/May/2025