दापोली : दापोली तालुक्यातील साकुर्डे येथे २८ मे रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीला शिवीगाळ करून कुऱ्हाडीने हल्ला करत जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मास्ती शांताराम सकपाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अशोक शांताराम सकपाळ याच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मारुती शांताराम सकपाळ (वय-४३, व्यवसाय-चिरेखाण व दुकान, रा. कुंभारखाणवाडी, साकुर्डे, ता. दापोली) हे त्यांच्या दुकानात असताना आरोपी अशोक शांताराम सकपाळ (रा. साकुर्डे, कुंभारखाण, ता. दापोली) याने त्यांना शिवीगाळ केली आणि निघून गेला.
या शिवीगाळबाबत जाब विचारण्यासाठी फिर्यादी आरोपीच्या घरी गेले असता, त्याचा राग मनात धरून आरोपी अशोक सकपाळने घराच्या पडवीत असलेली कुऱ्हाड फिर्यादीच्या खांद्यावर मारली. यानंतर दोघांमध्ये भांडण सुरू झाले. भांडणे सोडवण्यासाठी अमोल शिरगावकर आणि राम शिरगावकर हे तिथे आले असता, आरोपीने दुसरी कुऱ्हाड घेऊन फिर्यादीच्या उजव्या दंडावर मारून त्यांना गंभीर जखमी केले.
या घटनेनंतर फिर्यादी मास्ती शांताराम सकपाळ यांनी २९ मे रोजी पहाटे ३.१३ वाजता दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गु.र.नं. १०५/२०२५ भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ११८(१), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:42 30-05-2025














