देवरुखजवळ ओझरे गणेशवाडीत हातभट्टीची दारू जप्त, एकावर गुन्हा दाखल

देवरुख, ३० मे २०२५ : संगमेश्वर तालुक्यातील ओझरे गणेशवाडी येथे उघड्या जागेत काजूच्या झाडाजवळ विक्रीच्या उद्देशाने बाळगलेली हातभट्टीची दारू देवरुख पोलिसांनी जप्त केली आहे. बुधवारी (२९ मे) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून, जयप्रकाश श्रीराम जागुष्टे (वय ५५, रा. ओझरे खुर्द गणेशवाडी, ता. संगमेश्वर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत देवरुख पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस कॉन्स्टेबल अमर कमलाकर घाडी (वय ३०, बक्कल नंबर ५१६) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, २९ मे रोजी सायंकाळी ६ वाजता ओझरे गणेशवाडी येथील काजूच्या झाडाजवळ आरोपी जयप्रकाश जागुष्टे याने गैरकायदेशीररित्या आणि बिगरपरवाना विक्रीच्या उद्देशाने गावठी हातभट्टीची दारू आपल्या ताब्यात बाळगलेली होती.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत, पिवळ्या रंगाचा १५ लिटर मापाचा प्लास्टिक कॅन सापडला. यामध्ये ८ लिटर गावठी हातभट्टीची दारू होती, ज्याची अंदाजित किंमत ८५० रुपये आहे. तसेच, दारूचा वास असलेला एक जुना स्टीलचा ग्लास (किंमत ५ रुपये) देखील जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ८५५ रुपये आहे.

या प्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५९/२०२५, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:42 30-05-2025