खेड, ३० मे २०२५ : खेड तालुक्यातील दाभिळ येथील लेबर कॉलनीच्या मोकळ्या मैदानात क्रिकेट खेळत असताना एका सात वर्षीय चिमुकल्याचा सेफ्टी टाकीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी (२९ मे) सायंकाळी घडली. कार्तिक संजय गोरे (वय ७ वर्षे, ३ महिने) असे मृत मुलाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिक संजय गोरे हा दाभिळ नाका येथील एस.कॉन कंपनीच्या लेबर कॉलनीमध्ये आपल्या कुटुंबासह राहत होता. त्याचे मूळ गाव हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील आकाडा बाळापूर आहे. बुधवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास कार्तिक लेबर कॉलनीच्या मोकळ्या मैदानात क्रिकेट खेळत होता.
खेळता खेळता त्यांचा क्रिकेटचा बॉल जवळच्या संडासाच्या सेफ्टी टाकीवर गेला. बॉल घेण्यासाठी कार्तिक बंदिस्त केलेल्या टाकीच्या पत्र्याच्या बाजूने आतमध्ये गेला. त्याला पत्र्याचे झाकण असल्याचा अंदाज आला नाही आणि तो सेफ्टी टाकीतील पाण्यात पडला. कार्तिकसोबत खेळत असलेल्या लहान मुलांनी आरडाओरडा केल्याने कॉलनीमधील मुकादमाची पत्नी संगीता देवकर यांनी हे पाहिले.
संगीता देवकर यांनी तातडीने कॉलनीमधील आजूबाजूच्या लोकांना बोलावले. लोकांनी धावपळ करत कार्तिकला पाण्यातून बाहेर काढले आणि तात्काळ ॲम्बुलन्सने कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.
या घटनेमुळे लेबर कॉलनी परिसरात शोककळा पसरली आहे. खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ६०/२०२५ भारतीय न्यायसंहिता २०१७ च्या कलम १९४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:48 30-05-2025














