गुहागर : नाम फाऊंडेशन व ग्रामस्थांच्या लोकसहभागातून मार्गताम्हाने येथील पद्मावती नदीतील गाळ उपसा उपक्रम राबवण्यात आला. या नदीची पाहणी नाम फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष, सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी बुधवारी केली. नदीची पाहणी केल्यानंतर मार्गताम्हाने व मार्गताम्हाने खुर्द ग्रामस्थांतर्फे मकरंद अनासपुरे यांचा ग्रामदेवता पद्मावती देवी मंदिरात सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार मधुकर चव्हाण, डॉ. विनय नातू, देवस्थानचे अध्यक्ष संदीप चव्हाण, कृष्णा चव्हाण, मोहन चव्हाण, सौरभ चव्हाण, नाम फाऊंडेशनचे समीर जानवलकर, शिरीष मोरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी, नदीचा गाळ काढून झालेला असला तरी तिची देखभालही केली पाहिजे असे स्पष्ट केले. प्लॅस्टीक, कचरा नदीत टाकू नका. त्याचे संकलन करुन त्याची योग्य विल्हेवाट लावा किंवा प्लॅस्टीक कचऱ्यावर प्रक्रिया कशी होईल यासाठी गावातूनच लोकसहभाग निर्माण झाला पाहिजे. भंगार जमवून व त्याची प्रक्रिया करुन अनेकजण श्रीमंत झाले आहेत. आपणही गावात अशाप्रकारचे प्रक्रिया उद्योग उभारावेत व आर्थिक उन्नती साधावी. देवराईचे संवर्धन करावे, निसर्ग टिकवून पर्यावरणाचे रक्षण करावे व परप्रांतियांना जमिनी विकू नयेत असे मार्गदर्शन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:50 PM 30/May/2025














