रत्नागिरी : रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरावरच्या जेटींवर अस्ताव्यस्तपणे काढून ठेवलेल्या पर्ससिन नेट मच्छीमार नौकांच्या डिंगी आता बंदरावरील मोकळ्या जागेत ठेवण्यात आल्या आहेत. जेटीवर ठेवलेल्या या डिंगी तातडीने हलवण्याच्या सुचना सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाकडून संबंधित पर्ससिन नौका मालकांना करण्यात आल्या होत्या.
पर्ससिन नेट मासेमारी करणाऱ्या नौकांसोबत समुद्रात छोट्या होड्या म्हणजेच डिंगी असतात. ज्याठिकाणी नौकेच्या पागीला माश्यांचा थवा दिसून येतो त्याठिकाणी जाळे टाकताना त्या जाळ्याचे एक टोक या डिंगीतील कामगाराकडून सभोवताली फिरवले जाते. यामुळे पर्ससिन जाळे त्या माश्यांच्या थव्याची जाळ्यातून सुटका होण्याची शक्यता फारच कमी असते.
पर्ससिन मासेमारी पावसाळ्यात बंद होते तेव्हा नौका शाकारल्या जातात. अशावेळी समुद्रात सतत सोबत असलेल्या डिंगी बाहेर काढून ठेवल्या जातात. पावसाळी मासेमारी बंदीच्या पार्श्वभूमीवर १० मे पासून पर्ससीन नेट नौका जशा जेटींवर स्थिरावू लागल्या तशा या छोट्या नौका किंवा डिंगी जेटीवर काढून ठेवण्यात आल्या होत्या. जेटीवर सतत वाहनांची वाहतूक तसेच पादचाऱ्यांची ये-जा होत असते. वाहतुकीला आणि पादचाऱ्यांना अडचण होऊ नये यासाठी या डिंगी जेटीवरुन हटवण्याची सूचना मत्स्यव्यवसाय विभागाकडून करण्यात आली होती.
मिरकरवाड़ा बंदरावरील सर्व अनधिकृत बांधकाम हट वण्यात आले आहे. त्यामुळे जेटीवरील डिंगी बंदरावरील मोकळ्या जागेत सुरक्षितरित्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता जेटीवरची वाहतूक आणि इतर रहदारी सुलभ झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:57 PM 30/May/2025














