चिपळूण : मुसळधार पाऊस ही आधीच चिपळूणसाठी समस्या असताना त्याचवेळी कोळकेवाडी धरणातून पाणी सोडले जाणे ही पूर वाढवणारी गोष्ट असल्याचे याआधी अनेकदा सिद्ध झाले आहे. २०२१च्या अतिमहापुरात या पाण्याचाही वाटा मोठा होता. त्यामुळे पुन्हा तशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी हे पाणी सोडण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती पाणी सोडण्यावर नियंत्रण ठेवणार आहे.
कोळकेवाडी धरणातून वीजनिर्मितीनंतर सोडले जाणारे पाणी वाशिष्ठी नदीला मिळते. मुळातच मुसळधार पाऊस असेल तर वाशिष्ठीला पूर येतो. त्यात कोळकेवाडी धरणातील पाणी वाढले तर पुराची तीव्रता वाढते. एकतर वीजनिर्मितीनंतर पाणी सोडले जाते. त्यात धरण क्षेत्रातही अतिवृष्टीमुळेही धरणातील पाणीसाठा वाढतो. मर्यादेपेक्षा अधिक पाणीसाठा झाल्यास तेथूनही पाण्याचा विसर्ग करावा लागतो. त्यामुळे चिपळूणकरांचे संकट अधिक तीव्र होते.
पुराची तीव्रता वाढू नये, यासाठी या पाण्याच्या विसर्गावर नियंत्रण असणे आवश्यक आहे. त्यासाठीच ही समिती काम करणार आहे. या समितीने तसेच कोळकेवाडी धरण व्यवस्थापन व महाजनकोच्या अधीक्षक अभियंत्यांना पूरपरिस्थितीमध्ये जनरेशन कशाप्रकारे करावे, याबाबतच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. त्यानुसार आपत्कालीन परिस्थितीत कामकाज चालणार आहे. त्यामुळे चिपळूणच्या दृष्टीने हा निर्णय तितकाच महत्त्वाचा मानला जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:38 PM 30/May/2025














