आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे ग्रामदेवता मंदिराजवळ विजेची वायर तुटून अंगावर पडल्याने कोंडू बिरु जागली यांच्या मालकीची गाभण म्हैस दगावली. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. यामध्ये जागली यांचे एक लाखाचे नुकसान झाले.
कडवई ग्रामदेवता मंदिर येथे धरणाजवळ सायंकाळी कोंडू जागली हे जनावरे घेऊन जात असताना विजेची तार तुटून त्यांच्या म्हशीच्या अंगावर पडली. त्यामध्ये तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच तुरळ शाखेचे कनिष्ठ अभियंता वीरेंद्र सकपाळ, कर्मचारी सचिन कुंभार, अक्षय कांबळे, युवराज गायकवाड यांनी घटनास्थळी येत वीजप्रवाह बंद करून घटनेची पाहणी केली. गुरुवारी सकाळी पशुवैद्यकीय अधिकारी चारुदत्त बेलुरे यांनी शवविच्छेदन केले. तर ग्राम महसूल अधिकारी विठ्ठल सराई, उपसरपंच दत्ताराम ओकटे, पोलिस पाटील संजय ओकटे व अभियंता वीरेंद्र सकपाळ यांच्या उपस्थितीत घटनास्थळी पंचनामा करण्यात आला.
गेला आठवडाभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी गोठा कोसळून जनावरे दगावण्याचीही घटना घडली आहे. महसूल खात्याकडून या सर्व घटनांचे पंचनामे केले जात आहेत. जनावरांच्या मालकांना भरपाई मिळावी, अशी मागणी केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:50 PM 30/May/2025














