68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यासाठी दीक्षाभूमी गजबजली

नागपूर : आज नागपूरच्या प्रसिद्ध दीक्षाभूमी (Deekshabhoomi) येथे 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन (Dhammachakra Pravartan Din 2024) साजरा केला जात आहे. त्यासाठी देशभरातून हजारो आंबेडकरी अनुयायी नागपूरला दाखल झाले आहेत.

1956 मध्ये आजच्याच दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. तेव्हापासून दीक्षाभूमी येथे विजयादशमीला धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो. यावेळी शेकडो आंबेडकरी अनुयायांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीकलशाचे दर्शन देऊन बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याची परंपरा आहे. दीक्षाभूमीला आंबेडकरी अनुयायी आपले प्रेरणास्थान मानतात. त्यामुळे देशभरातून लाखोंचा जनसमुदाय हा दीक्षाभूमीला आजच्या दिवशी आवर्जून हजेरी लावतात.

या दिवसाची आठवण आणि बाबासाहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही अनुयायी दीक्षाभूमीवर दाखल झाले आहेत. 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा शनिवारी सायंकाळी ६ वाजता भिक्खू संघाच्या उपस्थितीत पार पडणार आहे. यंदा प्रथमच मंचावर कुठल्याही राजकीय नेत्याला स्थान दिले जाणार नाही. तर दीक्षाभूमीवर यंदाही दोनशेच्यावर पुस्तकांची दुकाने लावण्यात आली आहेत. यात बुद्ध, फुले, कबीर, आंबेडकर, पेरियार या महापुरुषांवर आधारित पुस्तके आहेत.

मनपाकडून नियंत्रण कक्षाची उभारणी

68 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर येणाऱ्या लाखो अनुयायांच्या सुविधेसाठी महानगरपालिका तर्फे साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ मनपा नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. तर धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दीक्षाभूमीवर येणाऱ्या बौद्ध अनुयायांच्या संख्या लक्षात घेता 11 ते 14 ऑक्टोबर या कालावधीमध्ये नागपूर महानगरपालिकेद्वारे दीक्षाभूमीवर अनुयायांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

बौद्ध अनुयायांसाठी सोयी सुविधा

तर दीक्षाभूमीवर येणाऱ्या मार्गांवर चार ठिकाणी मनपाचे आरोग्य तपासणी केंद्र, 24 तास रुग्णवाहिका, पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था, स्वच्छतेसाठी सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती, मदतीसाठी साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ नियंत्रण कक्ष, अग्निशमन पथक, शौचालयांची व्यवस्था, निवारा व्यवस्था, प्रकाश व्यवस्था, सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे, परिवहन व्यवस्था, अग्निशमन पथक आदी सर्व सुविधा मनपाद्वारे दीक्षाभूमीवर येणाऱ्या बौद्ध अनुयायांसाठी करण्यात आल्या आहेत.

तात्पुरत्या दवाखान्याची व्यवस्था

तसेच, एखादी आकस्मिक घटना घडल्यास आपदाग्रस्तांना तातडीने औषधोपचार मिळावा, यासाठी डॉक्टर, परिचारिका कर्मचारी अॅम्बुलन्स उपयुक्त साधनांसह 24 तास उपचार केंद्र सुरु राहणार आहे. याशिवाय रहाटे कॉलनी चौक, नीरी रोड, काचीपूरा चौक, बजाज नगर चौक ते लक्ष्मीनगर चौक येथे औषधोपचार व तात्पुरते दवाखान्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:39 12-10-2024