रत्नागिरी : यंदाच्या वर्षी मे महिन्यात पूर्वमोसमी पावसाने सर्व विक्रम मोडले होते, तर मान्सूननेही वेळेआधीच दमदार हजेरी लावली होती. सुरुवातीला पावसाचा जोर इतका होता की तो लगेच थांबणार नाही असे वाटले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून कोकण किनारपट्टीसह रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कमालीचा ओसरला आहे. समुद्रातही शांतता असल्याने आता प्रचंड उकाडा आणि घामाच्या धारांनी रत्नागिरीकर हैराण झाले आहेत.
गेल्या सुमारे दीड आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे सर्वत्र गारवा पसरला होता. पण आता हवेतील आर्द्रता वाढल्याने नागरिकांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. तापमानात काही अंशांनी वाढ झाल्यामुळे उकाड्याने नागरिक पुन्हा एकदा हैराण झाले आहेत.
पुढील काही दिवस मान्सून बेतानेच बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाट क्षेत्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या काळात ताशी ४०-५० किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:16 31-05-2025














