चिपळूण, रत्नागिरी : चिपळूण येथील कापसाळ टाटा मोटर्स शोरूमसमोर सर्व्हिस रोडवर गुरुवारी रात्री पोलिसांनी २३ लाख ९४ हजार रुपयांचा प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणी सज्जन रामचंद्र नेवगी (वय ३५, रा. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) याला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (२९ मे २०२५) रात्री ८.३० वाजताच्या सुमारास पोलीस हेडकॉन्स्टेबल समिधा सुहास पांचाळ यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, एम.एच.०७ ए.जे. ६०१० या क्रमांकाच्या पिकअप गाडीमध्ये प्रतिबंधित पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थ असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून सदर वाहन थांबवले.
वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये १५ लाख २४ हजार ६०० रुपये किमतीचे केसरयुक्त विमल पान मसाल्याचे ७,७०० किंग पॅकेट्स (प्रत्येक पुडीची किंमत १९८ रुपये) आणि १ लाख ६९ हजार ४०० रुपये किमतीचे व्ही-१ तंबाखूचे ७,७०० किंग पॅकेट्स (प्रत्येक पुडीची किंमत २२ रुपये) असा एकूण १७ लाख ९४ हजार रुपयांचा प्रतिबंधित माल आढळून आला. तसेच, ७ लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची पिकअप चारचाकी गाडी (एम.एच.०७ ए.जे. ६०१०) देखील जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत २३ लाख ९४ हजार रुपये इतकी आहे.
शुक्रवारी (३० मे २०२५) पहाटे ४.३४ वाजता चिपळूण पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम १२३, २७४, २७५, २२३ सह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ च्या कलम २६(२)(i), २६(२)(iv), २७(३)(d), ३०(२)(a), ३(१)(zz)(iv), ५९ नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सज्जन रामचंद्र नेवगी याला शुक्रवारी पहाटे ५.२८ वाजता अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 31-05-2025














