रत्नागिरी : पर्यटन स्थळ विकास योजनेंतर्गत रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतील थिबा पॅलेस राजमाता जिजामाता उद्यानात छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे काम पूर्ण झाले असून, याचे उद्घाटन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते मोठ्या अभिमानाने आणि जल्लोषात पार पडले.
यावेळी बोलताना पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, “छावा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच, दीड वर्षापूर्वीच रत्नागिरीत छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा उभा करण्यात यश आले आहे.” सुमारे ३००० चौरस फूट जागेत आणि दोन कोटी रुपयांच्या खर्चातून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारण्यात आला आहे.
या स्मारकात छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित माहिती, दृकश्राव्य माध्यमे, कलादालन आणि त्यांच्या विविध शौर्यगाथांचा समावेश आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश पर्यटक, अभ्यासक आणि विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना महाराजांचे पराक्रम, कर्तृत्व आणि जीवनकार्य समजून घेता यावे आणि त्यातून प्रेरणा मिळावी हा आहे, असे सामंत यांनी अधोरेखित केले.
या उद्घाटन सोहळ्याला शिवसेना नेते राजेंद्र महाडिक, उपजिल्हाप्रमुख राजन शेटे, शहरप्रमुख बिपिन बंदरकर, महिला शहर संघटक स्मितलताई पावसकर, उपशहरप्रमुख विजय खेडेकर, विभागप्रमुख संजय हळदणकर, युवासेना शहर समन्वयक प्रथमेश साळवी, उद्योजक सचिन लांजेकर, भाजपचे सचिन वहाळकर, विरेंद्र वणजू, शैलेश नार्वेकर, सौ. दिशा साळवी, बाबा नागवेकर तसेच रत्नागिरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांसह असंख्य रत्नागिरीकर नागरिक उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 31-05-2025














