राजापूरमध्ये निष्काळजीपणामुळे गायीचा मृत्यू, ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल

राजापूर, रत्नागिरी : शिळ भंडारवाडी येथील नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामात ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे एका गायीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात दिप्तेश प्रभाकर कदम यांच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम ४२९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना ५ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास शिळ भंडारवाडी येथील नळ पाणीपुरवठा योजनेच्या खोदलेल्या चरामध्ये घडली होती. याप्रकरणी गायीचे मालक सचिन सुधाकर बिर्जे (वय ४०, रा. शिळ भंडारवाडी, ता. राजापूर) यांनी शुक्रवारी (३० मे २०२५) राजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

फिर्यादीनुसार, दिप्तेश प्रभाकर कदम यांनी नळ पाणीपुरवठा योजनेचे पाईपलाईनचे काम घेतले होते. मात्र, त्यांनी हे काम मुदतीत पूर्ण केले नाही आणि पाईपलाईनसाठी खोदलेले चर तसेच उघडे ठेवले. याच चरामध्ये सचिन बिर्जे यांच्या मालकीची तांबड्या रंगाची गिर जातीची गाय पडून तिचा मृत्यू झाला. आरोपीला या घटनेची माहिती देऊनही त्याने जाणीवपूर्वक लक्ष दिले नाही आणि त्यामुळे बिर्जे यांचे मोठे नुकसान झाले, असे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपीच्या या बेजबाबदार आणि निष्काळजीपणामुळे गायीचा मृत्यू झाल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा घडल्यानंतर बराच कालावधी उलटूनही फिर्यादी आज गुन्हा दाखल करण्यासाठी आल्याने पोलिसांनी लगेच गुन्हा दाखल करून घेतला असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास राजापूर पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 31-05-2025