रत्नागिरी : रत्नागिरी शहरवासियांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे! गरोदर महिलांपासून ते १०० वर्षांच्या वृद्धांपर्यंत, सर्व प्रकारच्या आजारांवर मोफत उपचार आणि औषधांसह सेवा देणारे रत्नागिरीतील पहिले आणि महाराष्ट्रातील तिसरे रुग्णालय सुरू होत आहे. जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयाचे लोकार्पण रविवार, १ जून रोजी सकाळी १०.३० वाजता होणार असल्याची माहिती जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांच्यासोबत जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष केदार चव्हाण आणि सचिव अॅड. महेंद्र मांडवकर उपस्थित होते.
निलेश सांबरे यांनी सांगितले की, हे रुग्णालय तज्ज्ञ डॉक्टर आणि प्रशिक्षित पॅरामेडिकल स्टाफसह पूर्णपणे सुसज्ज करण्यात आले आहे. रुग्णालयात जनरल सर्जरी, हृदयरोग विभाग, कॅन्सर विभाग, लॅब, डायग्नोस्टिक सुविधा, बालरोग विभाग, युरोलॉजी विभाग, स्त्रीरोग विभाग, नेत्ररोग विभाग, एमडी मेडिसिन, ऑर्थोपेडिक विभाग, न्यूरो विभाग अशा विविध आरोग्य सेवा उपलब्ध असतील.
या रुग्णालयामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील गरजू रुग्णांना मोफत आणि अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार असल्याने आरोग्य क्षेत्राला मोठा आधार मिळणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 31-05-2025














