खेडमध्ये मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; चालक-मालकाला मारहाण

खेड, रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावर दाभिळनाका लवेल ते पिरलोटे, खेड दरम्यान एका भरधाव टाटा वाहनाने मारुती ईको गाडीला धडक दिल्याने अपघात झाला. अपघातानंतर टाटा गाडीतील अज्ञात चालकाने आणि त्याच्यासोबत असलेल्या तीन अनोळखी इसमांनी मारुती ईको गाडीच्या चालकाला मारहाण करत शिवीगाळ केली. ही घटना गुरुवारी (२९ मे २०२५) रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली.

याप्रकरणी साई राज दिपक साळवी (वय २८, रा. श्रीसंत गोराकुंभार आळी, ता. खेड) यांनी शुक्रवारी (३० मे २०२५) पहाटे १.५३ वाजता खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात टाटा वाहन (एम.एच.०८ डब्लू १९१३) वरील चालकासह तीन अज्ञात इसमांविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम २८१, ११५(२), ३५२, सह मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी साई राज साळवी हे त्यांच्या मारुती ईको गाडीने (क्र. एम.एच.०८ डब्लू १९१३) परशुराम मंदिरात जात होते. दाभिळनाका लवेल येथे आले असता, त्यांच्या पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या टाटा वाहनावरील अज्ञात चालकाने निष्काळजीपणे ओव्हरटेक करताना त्यांच्या वाहनाला ड्रायव्हर बाजूने घासून अपघात केला. यामुळे साळवी यांच्या वाहनाचे नुकसान झाले.

अपघात करून टाटा वाहन पुढे निघून जात असताना साळवी यांनी पाठलाग करून त्या वाहनाला पिरलोटे येथे थांबवले. अपघाताबाबत विचारपूस करत असताना, टाटा वाहनावरील अज्ञात चालकाने आणि त्याच्या बाजूला बसलेल्या अज्ञात इसमांनी साळवी यांच्या पाठीवर हाताने मारहाण केली आणि शिवीगाळ केली.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. खेड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत आणि फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 31-05-2025