चिपळूण : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या व मे महिन्यात कामाचा मुहूर्त सापडलेल्या शहरातील स्वामी मठ ते रामेश्वर मंदिर परिसरातील अर्धवट स्थितीतील रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. काही भागांत चिखल पसरला असल्याने वाहनचालकांसह नागरिकांचा त्रास आणखीनच वाढला आहे. त्यातच मोऱ्या लहान टाकल्या असल्याने पाणी साचण्याचा धोकाही वाढला आहे.
नगरपालिका सुमारे दीड कोटी रुपये खर्च करून हे काम करीत आहे. काही वर्षांपूर्वी स्वामी मठ ते महाराष्ट्र हायस्कूल हा रस्ता शहरातील मॉडेल रस्ता केला जाईल, अशी घोषणा तत्कालीन लोकप्रतिनिधी व प्रशासनाने केली होती; मात्र प्रत्यक्षात तसे न होता उलट करोडो रुपयांचा महागडा रस्ता बनावट कामांचा नमुना असल्याचा आरोप अनेकदा झाला आहे. रस्त्याला समपातळी नसून याच मार्गावरील मोऱ्या खचण्याचा प्रकार दोन वर्षांपूर्वी घडला होता. त्यावर नंतर तात्पुरता मुलामा टाकण्यात आला. स्वामी मठ ते रामेश्वर मंदिर हा रस्ता करण्याकडे इतकी वर्षे दुर्लक्ष झाले.
त्यामुळे या परिसरातील नागरिक हैराण झाले होते. काही महिन्यांपूर्वी नगरपालिकेने या रस्त्याचे काम हाती घेतले. दीड कोटी रुपये खर्च करून रुंदीकरण, मजबुतीकरण, डांबरीकरण व आवश्यक त्या ठिकाणी मोऱ्या असे या कामाचे स्वरूप आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील कामे झाली असून त्यानंतर जोरदार पावसाने हजेरी लावल्याने हे काम अर्धवट राहिले आहे. त्यामुळे सध्या काही भागांत चिखल पसरला असून येथून वाहने चालवणे कठीण बनले आहे. मुळातच हा रस्ता अनेक कारणांमुळे रखडला होता. त्यातच यावर्षी कामाला सुरुवात झाली असतानाच आता पावसाने कामाला ब्रेक लावला आहे. एवढेच नव्हे, तर झालेल्या कामाचीही बिकट अवस्था झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 AM 31/May/2025














