दापोली : नुकसान भरपाईकरिता पॅकेज जाहीर करण्याची मागणी

दापोली : ऐन मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे शेती, फलोत्पादन, मत्स्यव्यवसाय व पर्यटन व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाने याची पाहणी करून नुकसान भरपाईकरिता पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून करण्यात आली असून तसे निवेदन दापोली तहसीलदार अर्चना बोंबे यांना देण्यात आले आहे.

कोकणातील आंबा, काजू, फणस, कोकम या नगदी उत्पन्न देणाऱ्या पिकांचा हंगाम साधारण मेच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होतो आणि तो जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संपतो.

मॉन्सूनची सुरुवात ही साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात होते; मात्र यावर्षी मॉन्सूनपूर्व पाऊस हा मे महिन्यातच पडला. या पावसामुळे शेती बागायती फलोद्यान, मत्स्य आणि पर्यटन व मोठ्या व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या हंगामामधील उत्पन्नावर शेतकऱ्याचे पुढील ५ ते ६ महिन्याचे आर्थिक नियोजन असते.

ते पूर्णपणे कोलमडले असून, या उत्पन्नावर खरीपासाठी आवश्यक असलेली खते, बी-बियाणे याचा खर्च भागवणे शेतकऱ्यांना कठीण जाणार आहे, तर याबाबत शासनाने लक्ष देऊन लवकरात लवकर कोकणातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी दापोलीतील शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे. याविषयीचे निवेदन तहसीलदारांना देताना पक्षाचे तालुकाध्यक्ष सचिन तोडणकर, प्रदेश संघटक एम. आर. शेट्ये, महिला तालुकाध्यक्ष नीशा सावंत, दापोली शहराध्यक्ष खलिल डीमटिमकर, तालुका उपाध्यक्ष रऊफ काझी, अल्पसंख्यांक कार्याध्यक्ष सहिद कोंडेकर, शहर उपाध्यक्ष मुराद जोगीलकर आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:52 AM 31/May/2025