चिपळूण : विनोद झगडे यांचा लवकरच शिंदे शिवसेनेत प्रवेश

रत्नागिरी : लोकसभा, विधानसभा निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत करणाऱ्यांना पुन्हा पक्षात सन्मानाने घेतले जाते. हेच लोक जुन्या शिवसैनिकांना पक्ष निष्ठा शिकवतात. पक्षाविरोधात काम करणाऱ्यांसोबत काम करताना स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारापासून दूर जातात का? असा प्रश्न निर्माण होतो.

आपणही बाळासाहेबांच्या विचारांसोबत गेले पाहिजे, ही भावना सर्वसामान्य शिवसैनिकांची आहे. त्यामुळे लवकरच एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचेच काम करणार, असे सांगत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे चिपळूणचे माजी तालुकाप्रमुख विनोद झगडे यांनी शिवसेना पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब केले.

श्री. झगडे यानी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना भूमिका स्पष्ट केली. चिपळूण तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर झगडे कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याची चर्चा सुरू होती. चिपळूण दौज्यात पालकमंत्री उदय सामंत यांनी इगडे यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाची चर्चा झाली.

गेली साडेतीन वर्षे चिपळूण तालुक्याचा तालुकाप्रमुख म्हणून आपण उत्तमरित्या काम केले. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्राबल्य राहिले होते. आपण आपला बालेकिल्ला अबाधित ठेवण्यात यश मिळवले; परंतु याची दखल घेण्याची तसदी पक्ष नेतृत्वाला वाटली नाही. पक्षाकडून कोणतेही पाठबळ मिळत नाही. माजी खासदार विनायक राऊत केवळ भेटीगाठी घेण्यासाठी येतात; परंतु कार्यकर्त्यांना उभे करण्यासाठी त्यांच्याकडे धोरण नाही. सत्ता नसतानाही कार्यकर्ते काम करतात. तेव्हा त्यांच्या कामाचे कौतुक केले पाहिजे, परंतु पक्ष नेतृत्वाला याची आवश्यकता वाटत नसल्याची खंत झगडे यांनी व्यक्त केली.

बालेकिल्ला राहिलाय कुठे ?
कोकण म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजेच कोकण हे समीकरण शिवसेना प्रमुखांच्या काळात निश्चित होते; परंतु आज पक्षातील दिग्गज नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. ज्यांच्याकडून आम्ही राजकीय धडे घेतले, तेच आज समोर उभे आहेत. संपूर्ण कोकणात उबाठाचा एकमेव आमदार असल्याचे विनोद झगडे यांनी स्पष्ट केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 AM 31/May/2025