राजापूर एसटी डेपोमध्ये मद्यधुंद प्रवाशांचा धिंगाणा; दोघांविरोधात गुन्हा दाखल

राजापूर : राजापूर एसटी डेपोमध्ये शुक्रवारी (३० मे २०२५) सकाळी ९ ते दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान दारूच्या नशेत धिंगाणा घालणाऱ्या दोघांविरोधात राजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भीमराव गंगाराम मुंडे आणि अजिनाथ नारायण केदार (दोघेही रा. बीड, सध्या रा. एसटी डेपो राजापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत राजापूर एसटी डेपोचे वाहतूक निरीक्षक स्वप्नील शंकर कदम (वय ३५, रा. राजापूर, साखळकरवाडी, पाटील कॉम्प्लेक्स) यांनी राजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, शुक्रवारी सकाळी ९ ते दुपारी ३ च्या सुमारास भीमराव मुंडे आणि अजिनाथ केदार हे दोघे सार्वजनिक ठिकाणी, म्हणजेच राजापूर एसटी डेपोमध्ये दारू पिऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करत होते. त्यांनी हातवारे करत धिंगाणा घातला आणि फिर्यादीसोबत हुज्जत घातली.

या घटनेमुळे एसटी डेपोमध्ये काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. वाहतूक निरीक्षकांच्या तक्रारीनंतर, शुक्रवारी रात्री १०.४५ वाजता राजापूर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८५ (१) (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास राजापूर पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 31-05-2025