संगमेश्वर : देवरूख ग्रामीण रुग्णालयाची इमारत कोट्यवधी रुपये खर्चुन उभारण्यात आली आहे. मात्र त्याला वर्ष पूर्ण होण्याआधीच भिंतीवरील लाद्या पुन्हा कोसळू लागल्या आहेत. इमारतीचे बांधकाम सुरू असताना तिच्या दर्जाची पाहणी केली गेली होती की नाही, असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. किमान या पडणाऱ्या लाद्यांमुळे रुग्णालयात येणारे कोणी जखमी होऊ नये, याची दक्षता तरी रुग्णालय प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.
देवरूख ग्रामीण रुग्णालयाची जुनी इमारत मोडकळीस आली होती. ती इमारत लहानही होती. त्यामुळे तिच्या जागी कोट्यवधी रुपये खर्चुन नवी इमारत उभारण्यात आली आहे. गतवर्षी रुग्णालयाचे उद्घाटन झाले. मात्र एक वर्ष पूर्ण होण्याआधीच या देवरुख ग्रामीण रुग्णालयाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. इमारतीच्या भिंतीला लावण्यात आलेल्या लाद्या कोसळू लागल्या आहेत, संगमेश्वर तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी हे रुग्णालय असल्याने असंख्य ग्रामस्थ येथे उपचार घेण्यासाठी येतात. उद्घाटनानंतर काही दिवसांतच भिंतीच्या लाद्या पडू लागल्या होत्या. त्यावेळी ठेकेदाराने पुन्हा त्या बसवून दिल्या, आता पुन्हा लादी कोसळण्याचे सत्र सुरू झाले आहे. रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक येथे वावरताना अचानक एखादी लादी कोसळून अंगावर पडली तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न केला जात आहे. कोणतेही सरकारी बांधकाम सुरू असतानाच त्याचा दर्जा तपासणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने या इमारतीकडे पाहिले गेले की नाही, या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आहे का, एक वर्षाच्या आतच इमारतीचे ‘आरोग्य’ बिघडत असेल तर पुढे काय होणार, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
‘कामाची चौकशी व्हावी’
रुग्णालय बांधकामात काही गलथानपणा झाला आहे का, त्यासाठी दर्जाहीन साहित्य वापरले आहे का, याची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करावी, अशी अपेक्षाही केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 AM 31/May/2025














