राजापूर : मुंबई गोवा महामार्गावर राजापूर एसटी डेपोसमोरील पुलाबाबत व वाहतुक प्रश्नाबाबत माजी केंद्रीय मंत्री व रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार नारायण राणे यांच्या सोबत रविवारी चर्चा करून त्यांच्या सुचनेप्रमाणे व मार्गदर्शनाने हा प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही आमदार किरण सामंत यांनी दिली आहे.
मुंबई गोवा महामार्गावर राजापूर एसटी डेपोसमोरील वाहतुक प्रश्न त्याच बरोबर या ठिकाणी पलिकडे बंगलवाडी भागाकडे जाण्यासाठी असलेली पुलाची मागणी याबाबत आमदार किरण सामंत यांनी शुक्रवारी सायंकाळी या परिसरात भेट देत प्रत्यक्ष पहाणी केली. यावेळी त्यांनी स्थानिकांची मागणी व प्रश्न ऐकून घेतले व अधिकारी वर्गाशीही चर्चा केली.
मुंबई गोवा महामार्गा संबधी प्रश्नांबाबत खा. नारायण राणे हे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यामुळे राजापूर एसटी डेपोसमोरील वाहतुकीचा प्रश्न व पुलाची मागणी याबाबतही खा. राणे यांनी विस्तृत माहिती घेतलेली आहे. खा. राणे हे रविवारी राजापुरात येत आहेत. यावेळी खा. राणे यांच्या सोबत या भागाची पुन्हा पहाणी करून त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे हा प्रश्न निकाली काढला जाईल असे आ. सामंत यांनी सांगितले. तर रखडलेला पुलाचा एक मार्गही पुढील आठवडयात सुरू होणार असत्याचे आ. सामंत यांनी सांगितले.
शुक्रवारी महामार्ग पहाणी प्रसंगी पोलीस निरीक्षक अमित यादव, भाजपा जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर, शिवसेना तालुका प्रमुख दीपक नागले, प्रकाश कुवळेकर, विवेक गुरव, अरवींद लांजेकर, महेश मयेकर, भरत लाड, रवींद्र बावधनकर, सौरभ खडपे आदींसह अधिकारी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 AM 31/May/2025








