खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात ट्रकमधून ७० हजार रुपये किमतीचे साहित्य चोरीप्रकरणी अटकेत असलेल्या दोघांनी बोरज येथून जून महिन्यात १ लाख ४० हजार रुपये किमतीच्या मोबाईल टॉवरचे साहित्य चोरल्याची कबुली दिली.
भोस्ते घाटात ट्रकचालक झोपला असल्याची संधी साधत ट्रकमधील दोन बॅटऱ्या, स्टेपनी, टायर असा ७० हजार रुपयांचा ऐवज चोरल्याप्रकरणी येथील पोलिस पथकाने शंकर सुरेश बुरटे (३८, रा. चिपळूण-खंड-कांगणेवाडी), इब्राहिम सलीम पटाईत (२२, रा. गोवळकोट रोड-चिपळूण) यांच्या काही तासांतच मुसक्या आवळल्या.
पोलिसांनी दोन्ही संशयितांची कसून चौकशी केली असता आणखी एका चोरीचीही त्यांनी कबुली दिली. २१ जूनला बोरज येथील जिओ मोबाईल टॉवरचे १ लाख ४० हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरीस गेल्याची तक्रार नीलेश बबन धोत्रे यांनी येथील पोलिस ठाण्यात दिली होती.
या चोरीचीही या दोघांनी कबुली दिल्याने दुसऱ्या गुन्ह्यातही त्यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांचा अन्य चोऱ्यांमध्ये सहभाग असल्याच्या शक्यतेने पोलिसांकडून तपास गतीमान करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक एस. एल. कदम अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:52 PM 12/Oct/2024














