आपत्ती काळात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यानी जबाबदारी समजून मदतीसाठी सतर्क रहा : आमदार किरण सामंत

लांजा : अतिवृष्टी किंवा आपत्तीचा काही प्रसंग येईल त्या ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी स्वतःची जबाबदारी समजून मदतीसाठी सतर्क रहावे अशा सूचना आमदार किरण सामंत यांनी लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांना दिल्या आहेत.

कोकणात दरवर्षी जोरदार पर्जन्यवृष्टी होते. यावेळी झाडे पडणे किंवा वेगवेगळ्या आपत्ती येत असतात. अशा आपत्तीच्या काळामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस ठाणे, तहसीलदार, नगरपंचायत कार्यालये यांच्याद्वारे मदत केली जाते.

त्याचप्रमाणे येत्या काळामध्ये लांजा-राजापूर विधानसभा मतदार संघामध्ये जेथे पर्जन्यवृष्टी होईल आणि त्यामुळे कोणतीही आपत्ती निर्माण होईल त्याठिकाणी शिवसैनिकांनी सतर्क राहून मदतीला जावे. तसेच शहरी भागांतल्या ज्या ठिकाणी पाणी तुंबेल, पुरस्थिती येईल किंवा अन्य काही आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होईल त्या ठिकाणी शिवसैनिक काम करतील, असे आमदार सामंत यांनी सांगितले.

दरम्यान, मतदारसंघात पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची संबंधित अधिकाऱ्यांनी जागेवर जाऊन पंचयादी करावी तसेच पावसाच्या कालावधीत ज्या ठिकाणी नुकसान होईल, त्या ठिकाणचा कोणताही नुकसानग्रस्त व्यक्ति नुकसान भरपाई पासून वंचित राहता कामा नये, अशा सक्त सूचना आमदार किरण सामंत यांनी प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना दिल्या असल्याचे सांगण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:55 PM 31/May/2025