राजापूर : सागवे विभागातील विजेचा लपंडाव थांबवा अन्यथा वीज बिल भरणार नसल्याचा ग्रामस्थांचा इशारा

राजापूर : तालुक्यातील सागवे विभागात गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे सामान्य नागरिक पुरते हैराण झाले आहेत.

महावितरणने यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा वीज बिल भरणार नाही, असा स्पष्ट इशारा सागवे विभागातील ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबत सागवे ग्रामपंचायतीच्या वतीने आमदार किरण सामंत आणि महावितरण विभागाला निवेदन देण्यात आले आहे.

आमदार सामंत यांना निवेदन देताना अॅड. शशिकांत सुतार, सागवेच्या सरपंच सोनाली ठुकरूल, शिवसेना शाखाप्रमुख प्रकाश पारकर, सामाजिक कार्यकर्ते रोहन पुरळकर, गोठीवरेचे पोलिसपाटील नीलेश हळदणकर आदी उपस्थित होते. गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे.

या पावसामुळे सागवे विभागासह तालुक्याच्या अन्य भागांमध्येही वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे सागवे विभागातील अनेक गावे अंधारात होती, ज्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. मे महिन्यातील पावसामुळेच जर अशी स्थिती असेल, तर पुढील तीन महिन्यांच्या पावसाळ्यात महावितरण काय सुधारणा करणार, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना तात्काळ कराव्यात, अन्यथा वीजबिल भरणा केला जाणार नाही, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान आमदार सामंत यांनी महावितरणला सागवे विभागातील समस्या तातडीने सोडवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:56 PM 31/May/2025