चिपळुणातील ३९ प्राथमिक शाळांच्या इमारती धोकादायक

चिपळूण : जिल्हा परिषदेच्या चिपळूण तालुक्यातील ३९ प्राथमिक शाळांच्या इमारती धोकादायक बनल्या आहेत. यातील २५ शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीला परवानगी मिळाली आहे. मात्र, उर्वरित १४ शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

चिपळूणच्या शहर आणि ग्रामीण भागांतील अनेक शाळा नादुरुस्त झाल्या आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतण्याचा धोका निर्माण झाला आहे. यातील २५ धोकादायक बनलेल्या शाळांच्या दुरुस्तीला मंजुरी देण्यात आलेली आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीने निधी मंजूर केला आहे.

तालुक्यातील गोवळकोट शाळा, गोंधळे, चिवेली शाळांच्या इमारती धोकादायक झाल्या आहेत. काही गावांतील शाळांच्या इमारती विद्यार्थ्यांसाठी अतिशय धोकादायक आहेत. त्यामुळे खासगी जागेत शाळा भरवली जाते; तर काही इमारतीच्या ठिकाणी छतावर प्लास्टिक टाकून गळती काढण्यात आली आहे. ज्या शाळा नादुरुस्त आहेत, तेथे शिक्षण घेणे विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतणारे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास पालकही तयार होत नव्हते. या शाळांच्या दुरुस्तीची सातत्याने मागणी होत होती. आता त्यासाठी निधी मंजूर झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:14 PM 31/May/2025