रत्नागिरी : तालुक्यातील जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे येथे पर्यटकांच्या गर्दीत घट होऊ लागली आहे. ऐन पर्यटन हंगामात पावसाचा जोर वाढल्याने व्यवसायांवर मोठा परिणाम झाला आहे.
गणपतीपुळे येथे येथे दरवर्षी उन्हाळी पर्यटन हंगाम पर्यटकांच्या गर्दने गजबजत असतो. मात्र, पावसाने जोर धरल्याने पर्यटन व्यवसायाचे आर्थिक गणित पूर्णतः कोलमडून गेले आहे. येथील हॉटेल लॉजिंग व्यावसायिकांपेक्षा लहान व्यावसायिकांना पावसामुळे मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. सर्वाधिक फटका गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरील व्यावसायिकांना बसला आहे. येथील समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या व्यावसायिकांना गणपतीपुळे ग्रामपंचायतीकडून दरवर्षी ऑक्टोबर ते मे महिन्याच्या ३० तारखेपर्यंत आपले स्टॉल सुरू ठेवण्याची परवानगी मिळते. मात्र यंदा मे महिना पूर्णपणे आपले स्टॉल सुरू ठेवून चार पैसे गाठीशी बांधणाच्या तयारीत असलेल्या स्टॉल धारकांना मे महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात पावसामुळे स्टॉल बंद ठेवावे लागले. समुद्रकिनाऱ्यावरील वॉटर स्पोर्ट व्यवसायाला दरवर्षी मे महिन्याच्या २५ तारखेपर्यंत परवानगी असते.
मात्र मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाचा जोर वाढल्याने वॉटरस्पोर्ट व्यवसायाला देखील नुकसान सहन करावे लागले. एकूणच गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरील विविध लहान स्टॉल धारक, फोटोग्राफी व्यावसायिक, एटीव्ही बाईक, उंट, घोडे आदी व्यावसायिकांना पावसाचा जोर वाढल्याने वाढल्याने मोठा आर्थिक फटका करावा लागला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील विविध ठिकाणी पावसाचा जोर वाढल्याने पर्यटन स्थळांच्या ठिकाणी येणारे पर्यटक कमी होऊ लागल्याचे चित्र दिसून आले आहे त्याचाच परिणाम गणपतीपुळे पर्यटनावरही झाल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी १५ जून पर्यंत गर्दीने गजबजून आणि मोठ्या आर्थिक उलाढालीने सर्वच लहान मोठ्या व्यावसायिकांना दिलासा देणारा यंदाचा उन्हाळी पर्यटन हंगाम लवकरच संपुष्टात आल्याने पर्यटकांन व्यवसायावर पोट असणाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
पर्यटकांना पाण्यात न उतरण्याच्या सूचना….
पावसामुळे गणपतीपुळे समुद्रकिनारा मोठ्या प्रमाणात खवळला आहे. पाण्याची पातळी ही वाढू लागल्याने समुद्रात मोठ्या लाटा उसळत आहेत. समुद्राचे पाणी थेट समुद्र किनाऱ्यावर असलेल्या संरक्षण भिंतीच्या पायऱ्यांपर्यंत येऊन धडकत आहे. गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या जीवरक्षकांकडून पर्यटकांना धोक्याच्या सूचना दिल्या जात आहेत. तसेच समुद्राच्या पाण्यात न उतरण्याच्या सूचना पर्यटकांना जीवरक्षकांकडून देण्यात येत आहे. जीवरक्षकांकडून गस्त किनारपट्टीवर गस्त वाढवण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:02 PM 31/May/2025














