जयगड खाडीवर उभारणार ‘केबलस्टेड’ पूल

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) समुद्री महामार्गावर तब्बल ७१५ कोटी रुपये खर्चुन एक भव्य ‘केबलस्टेड’ पूल उभारण्यात येणार आहे. यामुळे गुहागर तालुक्यातील तवसाळ ते रत्नागिरी तालुक्यातील जयगड हे समुद्री अंतर सहजपणे पार करणे शक्य होईल. मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंकप्रमाणेच जयगड खाडीवरील या केबलस्टेड पुलामुळे येथील समुद्री महामार्गाच्या सौंदर्यात भर पडणार आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने रेवस ते रेड्डी असा ४९८ किलोमीटर लांबीचा समुद्री महामार्गाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या समुद्री महामार्गामुळे रायगडच्या किनारपट्टीचा भाग, तसेच पुढे रत्नागिरी जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या खाड्या आणि त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी गाव असे महत्त्वाचे भाग जोडले जाणार आहेत. या सागरी महामार्गासाठी ७ हजार ८५१ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

या सागरी महामार्गावर रेवस, धरमतर, कुंडलिका, आगरदांडा, बाणकोट, केळशी, जयगड आणि कुणकेश्वर असे एकूण ७ पूल उभारण्यात येणार आहेत. यापैकी रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड खाडीवर ७१५ कोटी रुपयांचा ‘केबलस्टेड’ पूल उभारला जाईल. या पुलाची लांबी २०९ किलोमीटर इतकी असून, रुंदी १८ मीटर असणार आहे. दोन पदरी वाहतुकीसाठी असणाऱ्या या पुलावर पर्यटकांसाठी दोन्ही बाजूला पादचारी रस्त्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. या पादचारी रस्त्यावरून पर्यटकांना जयगड खाडीचे मनोहारी दृश्य न्याहाळता येईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:31 PM 31/May/2025