संगमेश्वर : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोंड उमरे गावात नुकत्याच घडलेल्या एका घटनेत बिबट्याने थेट घराच्या अंगणात बांधलेल्या कुत्र्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोंड उमरे येथील रहिवासी प्रवीण जयराम जाधव हे मे महिन्याच्या सुट्टीत आपल्या गावी आले होते. गुरुवारी (३० मे) मध्यरात्री दीडच्या सुमारास त्यांच्या घराच्या अंगणात एका बिबट्याने शिरकाव केला. बिबट्याने अंगणात बांधलेल्या कुत्र्यावर अचानक हल्ला चढवला. सुदैवाने, बिबट्याच्या तावडीत सापडण्यापूर्वीच कुत्र्याने स्वतःची सुटका करून घेतली, त्यामुळे तो बचावला.
कोंड उमरे गावात बिबट्याच्या अशा थेट हल्ल्याच्या प्रयत्नामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असून, वन विभागाने यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:33 PM 31/May/2025














