पुणे : तुम्ही जर Google Pay, PhonePe किंवा इतर कोणत्याही ॲपवरून ऑनलाइन पैसे पाठवत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. 1 ऑगस्ट 2025 पासून युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) संबंधित सेवांमध्ये मोठे बदल होणार आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने यासंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून, यामुळे ऑनलाइन ॲप्स वापरणाऱ्यांना काही महत्त्वाच्या बदलांना सामोरे जावे लागणार आहे.
कोणते आहेत हे बदल आणि त्यांचा तुमच्यावर काय परिणाम होईल?
NPCI ने जारी केलेल्या या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, 1 ऑगस्टपासून UPI मधील काही सर्वाधिक वापरली जाणारी वैशिष्ट्ये मर्यादित केली जाणार आहेत. यामुळे UPI नेटवर्कवरील ताण कमी करणे आणि सेवेची स्थिरता सुनिश्चित करणे हा मुख्य उद्देश आहे.
यातील काही प्रमुख बदल असे आहेत:
बॅलन्स चेक करण्यावर मर्यादा: तुम्हाला वारंवार UPI ॲपवर बॅलन्स तपासण्याची सवय असेल, तर ती आता सोडावी लागेल. कारण, 1 ऑगस्टपासून तुम्ही दिवसातून फक्त 50 वेळाच बॅलन्स तपासू शकणार आहात. विशेषतः, सकाळी 10 ते दुपारी 1 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9:30 या पीक अवर्समध्ये बॅलन्स चेक करण्याची सुविधा प्रतिबंधित किंवा ब्लॉक केली जाईल. यामुळे UPI सिस्टीम क्रॅश होण्यासारख्या समस्या टाळता येतील. यापुढे, बँकांना प्रत्येक व्यवहारानंतर ग्राहकांना बॅलन्सची माहिती देणे बंधनकारक असेल, जेणेकरून बॅलन्स तपासण्याचे प्रमाण कमी होईल.
ऑटो-पे मध्ये वेळेची मर्यादा: Netflix, SIP किंवा इतर सेवांसाठी UPI ऑटो-पे वापरणाऱ्यांसाठीही बदल आहेत. आता ऑथोरायझेशन आणि डेबिट प्रक्रिया फक्त नॉन-पीक अवर्समध्येच केली जाईल. म्हणजेच, सकाळी 10 ते दुपारी 1 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9:30 या वेळेत ऑटो-पे संबंधित प्रक्रिया थांबतील.
ट्रान्झॅक्शन स्टेटस तपासण्यावर निर्बंध: जर तुमचे UPI पेमेंट नेटवर्क इश्यूमुळे किंवा इतर कारणांमुळे अयशस्वी झाले, तर वारंवार ट्रान्झॅक्शन स्टेटस तपासण्याची सुविधा मर्यादित केली जाईल. याचा अर्थ, तुम्हाला तुमच्या पेमेंटच्या स्थितीबद्दल त्वरित माहिती मिळणार नाही.
लिंक केलेल्या खात्यांच्या तपशीलांवर मर्यादा: वापरकर्ते त्यांच्या मोबाईल नंबरशी लिंक असलेल्या खात्यांची यादी एका दिवसात एका ॲपवरून केवळ 25 वेळाच तपासू शकतील. ही सुविधा तेव्हाच काम करेल जेव्हा वापरकर्ता बँकेची निवड करेल आणि बँकेची सहमती असेल.
हे बदल का आवश्यक आहेत?
गेल्या काही काळापासून UPI च्या वारंवार क्रॅश होण्याच्या घटना घडत होत्या. NPCI नुसार, वारंवार बॅलन्स तपासणे आणि इतर सेवांचा जास्त वापर केल्याने UPI नेटवर्कवर खूप दबाव येतो, ज्यामुळे सिस्टीममध्ये अडचणी येतात. या बदलांचा उद्देश UPI नेटवर्क स्थिर ठेवणे आणि ते सर्वांसाठी उपलब्ध असणे हा आहे, असे इजी पेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुशर्रफ हुसेन यांनी स्पष्ट केले आहे.
NPCI ने बँका आणि सेवा प्रदात्या कंपन्यांना वापरकर्त्यांच्या API वापराचे निरीक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. या नियमांचे पालन न केल्यास API निर्बंध, दंड आणि नवीन ग्राहक जोडण्यावर बंदी यांसारख्या कठोर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. सर्व सेवा प्रदात्या कंपन्यांना 31 ऑगस्ट 2025 पर्यंत सिस्टीमच्या ऑडिटचे अंडरटेकिंग द्यावे लागणार आहे.
या बदलांमुळे सुरुवातीला वापरकर्त्यांना काही गैरसोय होऊ शकते, पण हे नियम सिस्टीम अधिक सोपी आणि सुरक्षित बनवण्यासाठी केले आहेत, असे NPCI ने म्हटले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:44 31-05-2025














