रत्नागिरी : रत्नागिरीत एका मोठ्या सायबर फसवणुकीचा पर्दाफाश झाला आहे. मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन विभागातून बोलत असल्याची बतावणी करून सिम कार्ड बंद होण्याची भीती घालून आणि नंतर पोलीस अधिकारी असल्याचे भासवून एका व्यक्तीची तब्बल ₹61,19,080/- रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला रत्नागिरी सायबर पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने सुरुवातीला त्यांना मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन विभागातून बोलत असल्याचे सांगितले. त्यांचे सीम कार्ड बंद होणार असल्याची भीती घातली आणि पोलीस तक्रारीसाठी कॉल फॉरवर्ड करत असल्याचा बहाणा केला. त्यानंतर दुसऱ्या एका व्यक्तीने पोलीस अधिकारी असल्याचे भासवून फिर्यादीचे कॅनरा बँकेत खाते उघडले असून त्या खात्यातून ₹2 कोटी रुपयांचा मनी लाँड्रिंगचा व्यवहार झाल्याची भीती घातली. या भीतीमुळे फिर्यादीला त्या बँक खात्यामध्ये रक्कम भरण्यास भाग पाडले आणि त्यांची ₹61,19,080/- रुपयांची फसवणूक केली.
या गंभीर गुन्ह्याप्रकरणी सायबर पोलीस ठाणे, रत्नागिरी येथे गुन्हा रजिस्टर नंबर 05/2024 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 318 (4), 319 (2), 3 (5) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (सी), 66 (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हेगाराचा दिल्लीपर्यंत पाठलाग :
गुन्ह्याच्या तपासकामी फसवणुकीच्या आर्थिक व्यवहारांबाबत बँकांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी राजीव विश्वनाथ तिवारी (वय 47, रा. 78, नाका, शिवनगर कॉलनी, पहाड गंज, फैजाबाद, उत्तर प्रदेश 224001) हा सध्या स्वरूप विहार, दिल्ली येथे असल्याचे निष्पन्न झाले. कोणत्याही प्रकारचे मोबाईल लोकेशन उपलब्ध नसतानाही, रत्नागिरी सायबर पोलिसांच्या तपास पथकाने दिल्लीत स्थानिक बातमीदार तयार करून त्यांच्या आधारे आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीला माननीय न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला 04 दिवसांची पोलीस कोठडी रिमांड मिळाली आहे.
पोलीस दलाची कौतुकास्पद कामगिरी :
या गुन्ह्याचा तपास आणि आरोपीला अटक करण्याकरिता पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणे कडील प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती. स्मिता सुतार, पोहवा/157 रामचंद्र वडार, पोकॉ/74 रोहन कदम, पोकॉ/1203 रामदास पिसे, पोहवा/1040 संदीप नाईक, पोहवा/444 रमीज शेख यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.
सायबर फसवणुकीपासून सावध रहा! – रत्नागिरी पोलिसांचे आवाहन:
रत्नागिरी पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. “कोणीही मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन/नॅशनल सिक्युरिटी विभाग/इतर विभागातून बोलत आहोत असे सांगून तुमचे सिम कार्डचा गैरवापर झाला असून त्याकरिता तुमची चौकशी करावयाची असल्याचे सांगत असेल, तुमची वैयक्तिक व बँकांची आर्थिक माहिती मागत असेल तसेच अकाऊंट व्हेरीफिकेशन करिता पैसे ट्रान्सफर करा असे सांगत असेल, तर अशा कॉलवर विश्वास ठेवू नका. आपली वैयक्तिक/बँक खात्यांची माहिती कोणालाही देऊ नका व अशा धमक्यांना बळी पडू नका,” असे आवाहन रत्नागिरी पोलिसांनी केले आहे.
नेहमी लक्षात ठेवा : कोणताही सरकारी विभाग किंवा बँक तुम्हाला फोन करून तुमची वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती विचारत नाही. अशा संशयास्पद कॉल्सना बळी न पडता, तातडीने सायबर पोलिसांशी संपर्क साधा.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:06 02-06-2025














