चिपळूण : येथील मध्यवर्ती बसस्थानकाची जुनी इमारत तोडून नवीन ‘हायटेक’ बसस्थानक बांधण्यात येत आहे. त्यामुळे जीर्ण इमारत तोडतेवेळी जमा झालेले मोठ्या प्रमाणातील भंगार आगाराच्या आवारात ठेवण्यात आले आहे. सहा वर्षे उलटूनही त्याची निविदा प्रक्रिया न झाल्यामुळे भंगाराचा प्रश्न दुर्लक्षित आहे. विशेष म्हणजे या भंगाराची विक्री झाल्यास त्यातून एसटी महामंडळाच्या तिजोरीत भर पडणार आहे.
जीर्ण असलेल्या मध्यवर्ती बसस्थानकाची इमारत तोडून त्या जागी नव्याने सोयी-सुविधांयुक्त बसस्थानक बांधण्यास काही वर्षांपूर्वी सुरुवात झाली. बसस्थानकाची इमारत तोडतेवेळी त्यात लोखंडी छप्परासह पिलर व इतर अनेक लोखंडी भंगार जमा करण्यात आले होते. भारी वजनाचे असलेले हे भंगार जेसीबीच्या सहाय्याने उचलून आगाराच्या मोकळ्या जागेत ठेवण्यात आले होते.
सद्यःस्थितीत नव्या हायटेक बसस्थानक इमारतीचा पाया पूर्णत्वास गेला असून, पिलरसह पहिल्या मजल्याच्या स्लॅबचे कामही पूर्ण झाले आहे. असे असताना इतकी वर्षे होऊनही जुन्या इमारतीचे भंगार आहे त्याच ठिकाणी असून कित्येक वर्षात निविदा प्रक्रिया राबवलेली नाही. यामुळेच हा भंगार प्रश्न आजपर्यंत दुर्लक्षित राहिला आहे.
चिपळूण आगारात जमा झालेले भंगार विभागस्तरावर जमा केले जाणार आहे. त्यानंतर त्याची लिलाव प्रक्रिया होईल. आम्ही स्थानिक पातळीवर लिलाव प्रक्रिया करू शकत नाही. याबाबत विभाग स्तरावर कळवण्यात आले आहे – दीपक चव्हाण, आगारप्रमुख चिपळूण
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:06 AM 02/Jun/2025














