रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील शाश्वत मच्छिमार हक्क संघाने सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां.) तथा अभिनिर्णय अधिकारी, रत्नागिरी यांना एक निवेदन सादर करत, पारंपरिक मच्छिमारांना मासेमारीसाठी १५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. वादळी हवामानामुळे १० मे पासूनच ट्रॉलिंग फिशिंग करणाऱ्या नौका बंद असल्याने मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आल्याचे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनानुसार, शासनाच्या नियमानुसार मासेमारी बंदीचा काळ काही दिवसांवर असतानाच १० मे पासून अचानक हवामानात बदल झाल्यामुळे (वादळी वारे) पारंपरिक ट्रॉलिंग फिशिंग करणाऱ्या मच्छिमारांच्या नौका मासेमारीसाठी बंद आहेत. यामुळे मच्छिमार कर्जबाजारी झाले असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छिमारांवरही आत्महत्येची वेळ आल्याचे धक्कादायक विधान निवेदनात करण्यात आले आहे. तसेच, नौकांवरील तांडेल, खलाशी आणि कामगारांना पगार देणेही शक्य नसल्याची गंभीर परिस्थिती मच्छिमारांनी मांडली आहे.
या गंभीर परिस्थितीला बेकायदेशीरपणे चालणारी पर्ससीन नेट, मिनी पर्ससीन (यामा मशीनद्वारे) नेट आणि एल.ई.डी. मासेमारी कारणीभूत असल्याचे मच्छिमारांनी म्हटले आहे. शासनाने या सर्व गोष्टींचा गांभीर्यपूर्वक विचार करून पारंपरिक मच्छिमारांना १५ दिवसांची कायदेशीर मुदतवाढ द्यावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.
याशिवाय, मच्छिमार संघाने शासनाकडे आणखी एक महत्त्वाची विनंती केली आहे. ती म्हणजे, बंदीकाळाचा जुना नियम म्हणजेच १० जून ते १५ ऑगस्ट किंवा नारळी पौर्णिमा यापैकी जे आधी येईल तो कालावधी पुन्हा लागू करावा.
जर शासनाने या वेळी मच्छिमारांना सहानुभूतीपूर्वक सहकार्य न केल्यास, तालुक्यात शांतता भंग झाल्यास त्याला मच्छिमार नव्हे, तर शासन आणि संबंधित अधिकारी जबाबदार असतील, असा गंभीर इशाराही शाश्वत मच्छिमार हक्क संघाने निवेदनात दिला आहे. या निवेदनावर तालुक्यातील सर्व शाश्वत आणि पारंपरिक मच्छिमारांच्या सह्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 02-06-2025














