रत्नागिरी : जिजाऊ शैक्षणिक, सामाजिक संस्थेच्या माध्यमातून निलेशजी सांबरे यांनी कोकणासह महाराष्ट्रभर अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. जेव्हा जेव्हा जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून नीलेश सांबरे करत असलेल्या कामाची माहिती मिळते, तेव्हा तेव्हा थक्क व्हायला होते, असे प्रतिपादन राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांनी केले.
रत्नागिरीतील जिजाऊ संस्थेच्या भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्याला श्री. राणे उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष नीलेश सांबरे यांच्यासह भाजप कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण व अन्य मान्यवर उपस्थित होते.
रुग्णालयाला शुभेच्छा देताना श्री. राणे यांनी जिजाऊ संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक केले. ते म्हणाले, समाजातल्या प्रत्येक वर्गापर्यंत या संस्थेचे काम पोहोचले आहे. दिवसाचे 24 तास वर्षाचे 365 दिवस नीलेशजी सांबरे काम करतात. गोरगरिबांच्या आयुष्यात परिवर्तन निर्माण करण्याचे काम ते करत असून रत्नागिरीत उभे राहिलेले भगवान सांबरे मोफत रुग्णालय हा त्याचाच भाग आहे. श्री. सांबरे यांच्या या कार्याला आमच्या शुभेच्छा तर आहेतच पण या कामात कुठे अडथळे आले तर आम्ही सोबत आहोत ही ग्वाही यावेळी श्री. राणे यांनी दिली. हे काम करताना नीलेशजी सांबरे यांना वटवृक्षाखाली यायचे असेल तर भारतीय जनता पक्षात तुम्हाला योग्य तो मानसन्मान मिळेल अशी ग्वाहीसुद्धा श्री. राणे यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 02-06-2025














