खेडमध्ये जोखीमग्रस्त गावांत २४ तास वैद्यकीय पथके

खेड : तालुक्यात आपत्ती काळात नदीकाठच्या २४ गावांमध्ये रोगराई पसरण्याचा संभाव्य धोका आहे. या जोखीमग्रस्त गावांमध्ये खबरदारीच्यादृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर वैद्यकीय पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही पथके २४ तास कार्यरत राहणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी शैलेश खरटमोल यांनी दिली.

पूरस्थिती ओसरल्यानंतर या गावांमध्ये रोगराई पसरण्याचा धोका सर्वाधिक असतो. या पार्श्वभूमीवर तालुका आरोग्य विभागाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. स्वतंत्र नियंत्रण कक्षाची निर्मिती करण्यात आली असून पूरपरिस्थितीदरम्यन उद्भवणाऱ्या समस्यांचे तातडीने निवारण करण्यासाठी कक्षामार्फत पुरेपूर मदत केली जाणार आहे.

पूरस्थितीत नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्यापासून होणारा संभाव्य धोका टाळण्याच्यादृष्टीने आरोग्य विभागाकडून मेडिक्लोअरसारख्या पाणी शुद्ध करणाऱ्या औषधांचे वितरणही करण्यात येणार आहे. यासाठी अतिरिक्त साठा करण्यात आला आहे. आरोग्यसेविका व आरोग्यसेवक गावनिहाय भेटी देत पूरस्थितीनंतर उद्भवणाऱ्या आजाराविषयी ग्रामस्थांना मार्गदर्शन करणार आहेत. साथीचा फैलाव डोके वर काढणार नाही, या दृष्टीनेही आतापासूनच विशेष उपाययोजना करण्यावर भर देण्यात आल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी खरटमोल यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 AM 02/Jun/2025