रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याला अंमली पदार्थमुक्त करण्याच्या पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या सूचनेनंतर, खेड पोलिसांनी गांजा तस्करीवर मोठी कारवाई केली आहे. दि. 31 मे 2025 रोजी रात्री सुकिवली येथील चोरदा नदीच्या पुलाजवळ सापळा रचून, एका गांजा तस्कराला रंगेहाथ पकडण्यात आले.
पोलिसांना माहिती मिळाली होती की, एक इसम आपल्या होंडा ॲक्टिवा गाडीवरून गांजा घेऊन ग्राहकांना विकणार आहे. या माहितीच्या आधारे खेड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदारांच्या पथकाने सायंकाळी 7 ते रात्री 9.30 दरम्यान वेशांतर करून पुलावर पाळत ठेवली. रात्री 9.30 च्या सुमारास माहितीनुसारचा संशयित इसम, शंकर विनोद पारदे (वय 29, रा. सुकिवली, खेड), ॲक्टिवा गाडीसह तिथे आला. पोलिसांनी त्याला जागेवरच पकडून झडती घेतली असता, त्याच्याजवळ ₹16,695/- किमतीचा 1 किलो 162 ग्रॅम वजनाचा गांजा आणि ₹90,000/- किमतीची होंडा ॲक्टिवा गाडी (एम.एच.12 एक्स.जी. 5587) असा एकूण ₹1,06,795/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शंकर पारदे याच्याविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात अंमली औषधी द्रव्य व मन प्रभावी पदार्थ अधिनियम-1985 च्या कलम 8 (क), 20 (ब) 2 (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, खेड श्री. भागौजी औटी यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. नितीन पांडुरंग भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यशस्वी केली. या पथकात सहायक पोलीस निरीक्षक जयंत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक रोहीदास केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले, पोकॉ रूपेश जोगी, रोहीत जोयशी, अजय कडू, राम नागुलवार आणि वैभव ओहोळ यांचा समावेश होता.
जिल्ह्यातून अंमली पदार्थ पूर्णपणे नष्ट करण्यासाठी पोलीस दलाची ही मोहीम यापुढेही सुरू राहील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 02-06-2025














