रत्नागिरी : येथील अनबॉक्स युअर डिझायर या फूड डिलिव्हरी करणाऱ्या अॅपला ८ जून रोजी पाच वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्ताने ग्राहकांसाठी व रत्नागिरीकर रसिकांसाठी गाती सुरेल तारा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. संध्याकाळी ७ वाजता स्वा. वि. दामोदर सावरकर नाट्यगृहात हा कार्यक्रम रंगणार आहे.
हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला व विनामूल्य आहे. अनबॉक्स अॅपचे गौरांग आगाशे अॅपच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असतात. प्लास्टिक कचरा संकलन, ई-कचरा संकलन तसेच समाजातील विविध कारागिरांना एकत्रित प्लॅटफॉर्म देणे आदी उपक्रम ते राबवत आहेत. रत्नागिरीतील व्हायोलिन वादक उदय गोखले यांची संकल्पना असलेला गाती सुरेल तारा हा कार्यक्रम आहे. दोन ते अडीच तासांच्या या कार्यक्रमात व्हायोलिन या वाद्यावर विविध हिंदी-मराठी जुन्या नव्या गाण्यांचा आनंद रसिक प्रेक्षक घेऊ शकणार आहेत.
पूर्णपणे इन्स्ट्रुमेंटल स्वरूपाच्या असलेल्या या कार्यक्रमात व्हायोलिनवादन उदय गोखले, की-बोर्ड साथ राजन किल्लेकर, विनय चेउलकर, तबलासाथ सचिन भावे, बेस गिटार शैलेश गोवेकर, अकॉस्टिक गिटार गणेश साळोखे, हँडसोनिक किरण ठाणेदार, सुसंवादक निबंध कानिटकर, असे कलाकार कार्यक्रमात ऐकायला मिळणार आहेत. ध्वनिसंयोजन एस. कुमार साउंडचे उदयराज सावंत करणार आहेत. सर्व रसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन गौरांग आगाशे यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 AM 02/Jun/2025














