रत्नागिरी : रत्नागिरी येथील भाट्ये बीच पार्किंगजवळ पूर्ववैमनस्यातून एका तरुणाला लाकडी दांडके आणि हॉकी स्टिकने बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी, 30 मे रोजी सायंकाळी 6.30 वाजता घडली. या हल्ल्यात तरुणाचा चुलत भाऊ आणि मित्रही जखमी झाले आहेत.
या प्रकरणी फाईज जमीर होडेकर (वय 27) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 च्या कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फाईज होडेकर आणि त्याचा चुलत भाऊ समाक राईल होडेकर असे दोघे 30 मे रोजी सायंकाळी भाट्ये बीचवर फिरण्यासाठी गेले होते. भाट्ये बीचच्या पार्किंगजवळ आल्यानंतर, आरोपी अर्ष हुसेन नागोरे याच्यासोबत फिर्यादीचा पूर्वी वाद झाला होता. त्याच रागातून अर्ष नागोरे याने त्याच्या हातातील लाकडी हॉकी स्टिकने फाईज यांच्या डोक्यात, डाव्या हातावर आणि डाव्या खांद्यावर मारहाण केली.
यावेळी, आयान गनी मल्ला याने बेसबॉल स्टिकने, तर अफान हुसेन नागोरे आणि रिहान दिलावर शेख या दोघांनी त्यांच्या हातातील लाकडी दांडक्याने फिर्यादीला मारहाण केली. आरोपींनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिली. फाईज यांना वाचवण्यासाठी धावून आलेल्या त्यांचा चुलत भाऊ समाक राईल होडेकर याच्या हातावर आणि मित्र अल्तमश अहमद मस्तान याच्या डोक्यातही आरोपींनी दांडक्याने मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 02-06-2025














