चिपळूण : लोकसेवांची सूची असलेले क्युआर कोड सार्वजनिक ठिकाणी लावण्याच्या शासनाच्या आदेशानुसार अनेक शासकीय कार्यालयांनी लावले आहेत. त्यामुळे तो स्कॅन करताच शासकीय सेवा, त्यासाठी लागणारे शुल्क व काम पूर्ण होण्याची मुदत आदी माहिती नागरिकांना सहज समजत आहे. तसेच तक्रार करण्याचीही सुविधा आहे.
लोकसेवा हक्काचा कायदा २०१५ मध्ये तयार झाला आहे. त्यात अनेक तरतुदी आहेत; मात्र त्याबाबत शासकीय कार्यालये स्तरावर उदासीनता असल्याने या कायद्यानुसार नागरिकांना सेवांची माहिती मिळत नव्हती. केवळ कार्यालयांमध्ये हे फलक लावण्यात आले असून, त्याची अन्य भागांत जनजागृतीकडे सर्वच कार्यालयांनी उपयुक्त माहितीसह तक्रारही करण्याच्या सुविधेकडे दुर्लक्ष केले होते. हे शासनाच्या लक्षात आल्याने आता प्रत्येक कार्यालयाच्या सेवांचा क्युआरकोड तयार करण्यात आला असून, तो सेवा हक्क दिनाच्या पार्श्वभूमीवर लावण्याचे आदेश शासनाने सर्व कार्यालयांना दिले होते.
त्यानुसार येथील प्रांत, तहसील, नगर पालिकेने आपल्या सेवांचे क्युआर कोड कार्यालयांबाहेर लावले आहेत. हे क्युआर कोड स्कॅन करताच त्या कार्यालयांमार्फत दिल्या जाणाऱ्या सुविधा, त्यासाठी लागणारे शुल्क व ते काम किती दिवसात होईल, याची संपूर्ण माहिती मिळत आहे. एवढेच नव्हे तर त्या कार्यालयाची तक्रार करण्यासाठी दुसरा क्युआर कोड लावण्यात आला आहे. त्यामुळे तक्रार करणेही सोपे झाले आहे.
शहरभर लावणार फलक
नगरपालिकेच्या माध्यमातून जन्म-मृत्यू प्रमाण प्रमाणपत्र, विवाह नोंदणी, नव्याने कर आकारणी, करमाफी मिळणे, थकबाकी नसल्याचा दाखला, वारसा हक्काने मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे, आक्षेप नोंदवणे, झोन दाखला देणे, भाग नकाशा देणे, बांधकाम परवाना देणे, भोगवटा प्रमाणपत्र देणे, नळजोडणी देणे, प्लंबर परवाना, मंडपासाठी नाहरकत दाखला, फेरीवाले नोंदणी प्रमाणपत्र देणे आदी ६५ प्रकारच्या सेवा दिल्या जातात. त्याचा क्युआर कोड सध्या नगरपालिका परिसरात लावण्यात आला आहे. तसेच शहरातील विविध भागांत लावण्याची प्रक्रिया उपमुख्याधिकारी सतीश दंडवते, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, अधीक्षक रोहित खाडे, उद्यान विभागप्रमुख प्रसाद साडविलकर आदींनी सुरू केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 AM 02/Jun/2025














