पूर्णगडमध्ये अवैध गावठी दारूविक्रीवर पोलिसांचा छापा; एक अटकेत!

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील पूर्णगड येथे अवैध गावठी दारूविक्री करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. दि, 31 मे रोजी सायंकाळी 6.20 वाजता गोळप, हनुमानवाडीकडे जाणाऱ्या पाखाडीच्या बाजूला असलेल्या एका पडक्या घरासमोरील अंगणात ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याच्या मपोशि/1580 मिनल शशांक पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पूर्णगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 45/2025 अंतर्गत महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, योगेश चंद्रकांत पड्धार (वय 40) या आरोपीने गैरकायदेशीररित्या आणि परवान्याशिवाय गावठी हातभट्टीची दारू विक्री करण्याच्या उद्देशाने आपल्या ताब्यात बाळगली होती. पोलिसांनी छापा टाकून त्याला पकडले असता, त्याच्याजवळ ₹950/- किमतीची 9 लिटर गावठी हातभट्टीची दारू कॅनसह आणि ₹40/- किमतीची दारूच्या वासाची दोन काचेची ग्लासे असा मुद्देमाल मिळून आला.

जिल्ह्यात अवैध दारूविक्रीवर कठोर कारवाई करण्याचे सत्र सुरू असून, अशा प्रकारच्या कारवाया सुरूच राहतील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 02-06-2025