कोकणात राजकीय भूकंपाची शक्यता : ‘कदमांसोबत जुळवून घ्या’ वैभव खेडेकरांना कुणी दिले आदेश ?

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) निष्ठावान नेते वैभव खेडेकर लवकरच मनसेला सोडचिठ्ठी देऊन शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्या एका सोशल मीडिया स्टेटसमुळे या चर्चेला आणखीनच बळ मिळाले आहे.

‘निष्ठवंतांना पक्षात किंमत नसते’ – खेडेकर यांच्या स्टेटसने खळबळ
गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांनी आपल्या सोशल मीडिया स्टेटसवर ‘निष्ठवंतांना पक्षात किंमत नसते’ असे विधान केले होते. यामुळे ते मनसे नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली. या स्टेटसमुळेच त्यांच्या पक्ष सोडण्याच्या शक्यतांना उधाण आले आहे.

रामदास कदम आणि उदय सामंत यांचे आमंत्रण
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाचे महत्त्वाचे नेते रामदास कदम आणि उदय सामंत यांनी वैभव खेडेकर यांना शिवसेनेत येण्याचे आमंत्रण दिले आहे. यामुळे कोकणातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, वैभव खेडेकर यांचा शिवसेनेतील प्रवेश शिंदे गटासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.

वैभव खेडेकर यांची भूमिका काय?
‘निष्ठवंतांना पक्षात किंमत नसते’ या विधानाचा अर्थ स्पष्ट करताना वैभव खेडेकर यांनी ‘रत्नागिरी खबरदार’शी बोलताना सांगितले की, त्यांची ही भूमिका पक्षातील काही लोकांबाबत आहे. ते म्हणाले, “गेली तीस वर्ष मी राज साहेबांसोबत आहे, मात्र मागील दहा वर्षांपासून मला अनेकवेळा निष्ठा दाखवण्याची परीक्षा द्यावी लागते. याला कारणीभूत मुंबईतील शिवाजीपार्क मित्रमंडळातील काही लोक आहेत. ते सातत्याने कोकणात येऊन दुफळी माजवण्याचा प्रयत्न करतात. हीच लोक राजसाहेबांना चुकीची माहिती देऊन गैरसमज करून देतात. हीच भूमिका पक्षातील अनेक नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची आहे आणि ती मी बोलून दाखवली आहे.”

खेडेकर यांनी पुढे स्पष्ट केले की, “आमची हीच भूमिका आम्ही राज साहेबांकडे मांडू आणि राजसाहेब यावर मार्ग काढतील असा मला ठाम विश्वास आहे. मला जोपर्यंत साहेब बोलावून सांगत नाहीत तोपर्यंत मी वाट पाहणार.”

कदम पिता-पुत्रांशी जवळीक आणि राज ठाकरेंचा आदेश
राज्यमंत्री योगेश कदम यांनी देखील खेडेकर शिवसेनेत आल्यास त्यांचे स्वागतच करू असे म्हटले आहे. वैभव खेडेकर यांची सध्या रामदास कदम आणि योगेश कदम या पिता-पुत्रांसोबतची जवळीक वाढताना दिसत आहे. यासंदर्भात बोलताना वैभव खेडेकर यांनी एक महत्त्वाचा खुलासा केला. ते म्हणाले, “कदमांसोबत जुळवून घ्या असे आम्हाला स्वतः राज साहेबांनी सांगितले होते. त्या पद्धतीने आम्ही आमची राजकीय कटुता विसरलो, आता आमचे चांगले सबंध आहेत.”

राज ठाकरेंच्या भेटीनंतरच अंतिम निर्णय
या सर्व घडामोडींवर बोलताना वैभव खेडेकर यांनी सांगितले की, “आम्ही राज साहेबांची अनेक वर्ष भक्तीच करतोय, निव्वळ साहेबांवरील प्रेम यामुळेच मी या ठिकाणी पक्ष वाढवू शकलो. एखादा मोठा निर्णय सहजासहजी होत नाही, राज साहेबांकडे माझे मन मी मोकळे करीन. मला खात्री आहे ते माझे ऐकून घेतील. मिडीयामध्ये ज्या चर्चा चालू आहेत त्याला यावेळी उत्तर देणे शक्य नाही. राज ठाकरे यांना भेटल्यानंतरच माझी भूमिका मी स्पष्ट करीन.”

एकंदरीत, वैभव खेडेकर यांच्या भूमिकेमुळे आणि त्यांच्या शिंदे गटासोबतच्या वाढत्या जवळीकमुळे रत्नागिरीच्या राजकारणात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. राज ठाकरे यांच्यासोबतच्या भेटीनंतरच या राजकीय भूकंपाचे चित्र अधिक स्पष्ट होईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 02-06-2025