रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील कोंडओझरे येथील शांताराम गंगाराम नाचरे (७५) या वृध्दाने आजारपणाला कंटाळून स्वतःला पेटवून घेतले होते. उपचारादरम्यान त्यांचा शनिवार, ३१ मे रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, कोंडओझरे, देवरुख, ता. संगमेश्वर येथील रहिवासी शांताराम नाचरे यांनी शुक्रवार, ३० मे रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास आपल्या पत्नीला ‘माझ्या छातीत दुखत आहे, तू बाहेरून रिक्षा घेऊन ये’ असे सांगितले. पतीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांची पत्नी घराबाहेर गेली असता, शांताराम नाचरे यांनी घरातील रॉकेल अंगावर ओतून स्वतःला पेटवून घेतले. त्यांची पत्नी रिक्षा घेऊन परतल्यावर त्यांना पती शांताराम भाजून गंभीर जखमी झालेले दिसून आले. त्यांनी तात्काळ शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना प्रथम देवरुख ग्रामीण रुग्णालयात नेले. अधिक उपचारांसाठी त्यांना मध्यरात्री २.४५ वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना, सकाळी साडेसहा वाजता त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 AM 02/Jun/2025














