राजापूर भाजी मार्केटमध्ये हार न मिळाल्याने वाद; दुकानदाराने कैचीने हल्ला केल्याचा आरोप

रत्नागिरी : राजापूर नगरपरिषदेजवळील भाजी मार्केटमधील फुलांच्या दुकानात हार न मिळाल्याच्या किरकोळ कारणावरून वाद होऊन एका दुकानदाराने ग्राहकावर लोखंडी कैचीने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना 31 मे रोजी सकाळी 9.15 वाजता घडली. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुभाष शाम बाकाळकर (वय 42) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नामदेव राजाराम आडविलकर (वय 51) आणि प्रमोद राजाराम आडविलकर या दोघांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 118(1), 352, 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सुभाष बाकाळकर हे राजापूर नगरपरिषदेजवळील भाजी मार्केटमधील फुलांच्या दुकानात हार घेण्यासाठी गेले होते. त्यांनी बनवायला सांगितलेला हार मागितला असता, आरोपी नामदेव आडविलकर यांनी त्यांना ‘तुला थांबायचे असेल तर थांब नाहीतर चालता हो’, असे उद्धटपणे बोलले. तसेच, ‘तुला हार देत नाही, तुला काय करायचे आहे ते कर’, असे सांगून मोठ्या आवाजात शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांनी सुभाष यांना “हा स्वतःला शहाणा समजतो” असे सर्वांसमोर वारंवार बोलून अपमानीत केले.

जेव्हा सुभाष यांनी शिवीगाळ का करत आहात असे विचारले, तेव्हा नामदेवने आपल्या दुकानातील लाकडी फळी सुभाष यांच्या हातावर फेकून मारली, ज्यामुळे त्यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. यावेळी, सुभाष यांचा लहान भाऊ विनोद शाम बाकाळकर भाजी घेऊन दुकानात आले असता, आरोपी नामदेव आडविलकरने आपल्या दुकानातील मोठी लोखंडी कैची घेऊन विनोदवर मारण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. राजापूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 02-06-2025