गुहागर : सुनेवर अत्याचार करणाऱ्या सासऱ्याला गावातून हद्दपार करण्याचा ग्रामसभेत एकमुखी ठराव

गुहागर : गुहागर तालुक्यातील झोंबडी गावात दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विजय शांताराम सकपाळ (६०) याने आपल्याच २१ वर्षीय नवविवाहित सुनेवर वारंवार लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याने त्याला गावातून हद्दपार करण्याचा एकमुखी ठराव ग्रामसभेत संमत करण्यात आला. सरपंच यांनी या प्रकरणी घेतलेल्या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच, यापुढे गावात अशा प्रकारचे कृत्य कोणी केल्यास त्यांच्यावरही अशीच कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.

विजय शांताराम सकपाळ या साठ वर्षीय व्यक्तीने आपल्याच सुनेचा सातत्याने विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. सुनेने त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून २५ मे रोजी गुहागर पोलीस ठाण्यात सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होऊन दोन दिवस उलटले तरी संबंधित आरोपीला पोलिसांनी अटक केली नव्हती. यानंतर गुहागर तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत पोलिसांना जाब विचारल्यानंतर आरोपी सकपाळ याला अटक करण्यात आली.

ही घटना अत्यंत संतापजनक असून, नराधम सासऱ्याने सुनेच्या एकांताचा गैरफायदा घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारच्या व्यक्तीमुळे गावाचे नाव खराब होते आणि समाजात चुकीचा संदेश जातो, असे मत व्यक्त झाले. त्यामुळे सदर ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी शुक्रवार, ३० मे रोजी सकाळी ११.३० वाजता झालेल्या ग्रामसभेत हा विषय उपस्थित केला. त्यांनी सांगितले की, आपल्या कुटुंबातीलच महिलेवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला गावात राहण्याचा कोणताही अधिकार नाही. गावातील महिलांना असुरक्षित वाटू नये, यासाठी सदरील व्यक्तीला गावातूनच हद्दपार करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. ज्याप्रमाणे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला जिल्ह्यातून तडीपार केले जाते, त्याच पद्धतीने सकपाळ यांना देखील गावातून हद्दपार करावे, अशी मागणी सर्वानुमते करण्यात आली. उपस्थित नागरिकांनी या ठरावाला पाठिंबा देत तो ग्रामसभेत संमत केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 AM 02/Jun/2025