रत्नागिरी : वीज ग्राहकांच्यामध्ये वीज अपघातांबाबत जागरूकता निर्माण व्हावी, वीज अपघातांचे प्रमाण शून्यावर यावे म्हणून महावितरणने मॅरेथॉन – ‘रन फॉर सेफ्टी’चे आयोजन रविवारी केले होते.
रत्नागिरी परिमंडलाचे कार्यकारी अभियंता (प्रशासन) अभिजित सिकनीस यांच्या हस्ते या मॅरेथॉन – ‘रन फॉर सेफ्टी’ला झेंडा दाखवून सुरुवात झाली.
आम्ही सुरक्षेचे शिल्पकार, शून्य अपघाताने करू महावितरणचे ध्येय साकार हे ब्रीद घेऊन महावितरणच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयात आजपासून ६ जूनपर्यंत विद्युत सुरक्षा सप्ताहात विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रविवारी जनजागृती फेरी काढली. या मॅरेथॉन – ‘रन फॉर सेफ्टी’ला कार्यकारी अभियंता नितिन पळसुलेदेसाई, हरी ताम्हणकर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्रीकृष्ण वायदंडे, वरिष्ठ व्यवस्थापक (विवले) मिलिंद कानडे, उपव्यवस्थापक (मासं) राजेंद्र जाधव तसेच महावितरण कार्यालयातील उपविभागीय अधिकारी, शाखा अभियंते व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कर्मचाऱ्यांनी वीज सुरक्षेचे संदेश देणारे फलक हातात धरले होते. तसेच वीज सुरक्षेबाबत विविध घोषणाही देण्यात आल्या. परिमंडल कार्यालयात आल्यानंतर कार्यकारी अभियंत्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना वीज सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर स्वतःच्या व नागरिकांच्या विद्युत सुरक्षेबाबत सजग राहत अपघात टाळण्याची सामूहिक शपथ देण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 02-06-2025














