लांजा : लांजा शहरात सुरू असलेल्या कल्याण मटका नावाच्या जुगारावर लांजा पोलिसांनी छापा टाकून एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. लांजा मच्छी मार्केटमागे दि, 31 मे रोजी दुपारी 12.45 वाजता ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्याचे पो.कॉ. नितेश चंद्रकांत (ब.नं. 107) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 111/2025 अंतर्गत महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम 12 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजन गजानन कांबळे (वय 46, रा. आर्डे) हा स्वतःच्या फायद्यासाठी कल्याण मटका नावाच्या जुगारावर लोकांकडून पैसे स्वीकारून जुगाराचा खेळ खेळवत होता. पोलिसांनी छापा टाकून त्याला रंगेहाथ पकडले. त्याच्या ताब्यातून जुगारासाठी वापरले जाणारे साहित्य आणि रोख ₹535/- जप्त करण्यात आले आहे.
लांजा पोलिसांनी ही कारवाई करून जुगारावर अंकुश मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे सत्र सुरूच राहील, असे संकेत या कारवाईतून मिळत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 02-06-2025














