रत्नागिरी : सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांचे जानेवारी २०२५ पासूनचे थकीत असलेले संपूर्ण मानधन वेतन चिठ्ठीसह न मिळाल्यास जुलैपासून आंदोलनाचा इशारा राज्य आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या जनरल सेक्रेटरी सुमन पुजारी यांनी दिला. याबाबतचे निवेदन केंद्रीय आरोग्य मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, सचिव व राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अभियान संचालक यांना संघटनेतर्फे ३९ मे रोजी पाठवल्याची माहिती त्यानी दिली.
सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांना १ जानेवारी २०२५ पासून केंद्र सरकारचे मानधन मिळालेले नाही. तसेच राज्य शासनाकडून मिळणारे मानधनही पूर्णपणे दिले गेलेले नाही. त्यामुळे वाढत्या महागाईच्या काळात राज्यातील ७२ हजार आशा व गटप्रवर्तक महिलांचे अतोनात हाल होत आहेत. ही गोष्ट लक्षात घेऊन सर्व थकीत मानधन त्वरित दिले जावे, असे राज्यात कामावर आधारित मोबदला नेमका किती होतो, हे आशांना समजण्यासाठी वेतन चिठ्ठी आशांना प्रत्यक्ष देण्यात यावी, असे सक्त आदेश आहेत; परंतु या आदेशाची अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे आशा महिलांना कोणत्या कामाचे किती मानधन मिळाले, हे समजत नाही. त्यात चूक झाल्यास आशांचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच यामध्ये गैरव्यवहाराचीही शक्यता आहे. आशा महिलांचे मानधनबाबतचे सर्व रेकॉर्ड असूनही त्याची माहिती आशांना दिली जात नाही.
बँकेमध्ये मानधन जमा करताना आरोग्य कार्यालयात त्याचे रेकॉर्ड असते; परंतु त्याची प्रत देण्याचा शासनाचा आदेश असूनही त्याची अंमलबजावणी अधिकाऱ्यांकडून केली जात नाही. त्यामुळे आशांवर अन्याय होत आहे. १ जानेवारीपासूनचे मानधन अद्याप आशा, गट प्रवर्तक महिलांना मिळालेले नाही. याबाबत शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.
ऑनलाईन कामाची सक्ती
काही अधिकारी आशांवर अन्य कामे करण्यासाठी दबाव टाकत असल्याच्या तक्रारी येत आहेत. ऑनलाईन कामाची सक्ती केली जाते. ही कामे महिलांना विनामोबदलाच करावी लागत आहेत. जे काम ठरवून दिलेले नाही ते काम आशांकडून सक्तीने करून घेतले जात आहे. दिलेल्या कामाव्यतिरिक्त उर्वरित कामे करून घेऊ नयेत, अशा सूचना अधिकाऱ्यांना द्याव्यात, ही मागणीही करण्यात आल्याचे सुमन पुजारी यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 AM 02/Jun/2025














